मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक बुध्दिबळ स्पर्धेत सहकारी बँकांमधील नामवंत ३२ बुध्दिबळपटूमध्ये अजिंक्यपदासाठी १४ जानेवारी रोजी दादर-पश्चिम येथे चुरस राहील. स्पर्धेमध्ये जनकल्याण सहकारी बँक, मुंबै बँक, मराठा सहकारी बँक, महाराष्ट्र मंत्रालय बँक, अपना सहकारी बँक, नेव्हल डॉकयार्ड बँक, चेंबूर नागरिक सहकारी बँक, विमा कामगार को-ऑप.बँक, एनकेजीएसबी, कोंकण मर्कन्टाईल बँक, एसटी को-ऑप. बँक, म्युनिसिपल को-ऑप. बँक, डहाणू रोड जनता को-ऑप. बँक आदी सहकारी बँकांचे खेळाडू विजेतेपदाच्या संभाव्य दावेदारीसाठी पूर्ण तयारीनिशी खेळणार आहेत.
पुरुष गटात विजेतेपदासाठी झुंज देतांना साईराज घाडीगावकर, आनंद साळकर, दीपक गायकवाड, भार्गव धारगळकर, वैभव सागांवकर, ज्ञानेश दुबळ, सचिन काटकर, भगवान पाटील, अक्षय गावडे, निखील सावंत, मोहनीश गावड, शुभम महाडिक, श्रेयस प्रभू, रजनीकांत शिरबावकर, महेंद्र दळवी, मयुरेश बांदकर, विनोद मोरे, शब्बीर मोनिये, अथर्व नेवगी, राजू कांबळे, विजय बुंदेले, प्रशांत कांबळे आदी बुध्दिबळपटूचे डावपेच प्रेक्षकांना पाहण्यास मिळतील. महिलांमध्ये मराठा सहकारी बँकेच्या ज्योती परब, नंदिनी तावडे आणि नेव्हल डॉकयार्ड बँकेच्या प्रिया चव्हाण यांच्यामध्ये विजेतेपदाची संभाव्य दावेदारी असण्याची शक्यता आहे. स्पर्धेचे उदघाटन को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे, प्रवीण शिंदे, भार्गव धारगळकर, हाशम धामसकरसह इतर पदाधिकारी कार्यरत आहेत.