मुंबई : महाराष्ट्रात अनेक बचत गट निर्माण झाले आहेत. बचत गटामार्फत महिला सभासदांना बिनव्याजी कर्ज मिळते तसेच सरकारमार्फत अनेक सवलती मिळतात. आता बचत गटाच्या माध्यमातून उद्योग गट निर्माण करण्याचं काम केलं जाईल, असे महत्वपूर्ण स्पष्ट उद्गार दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे विभागीय संचालक चंद्रसेन जगताप यांनी प्रशिक्षण शिबिरात काढले.
भारत सरकार श्रम व रोजगार मंत्रालय व मुंबई महानगर पालिकेच्या समाज विकास विभाग एच/पुर्व यांच्या संयुक्त विद्यमाने मा.सहाय्यक आयुक्त नियोजन/व सहाय्यक आयुक्त एच/पुर्व,मा.मुख्य समाज विकास अधिकारी नियोजन यांच्या मार्गदर्शनाखाली १२ जानेवारी, २०२३ रोजी सांताक्रूझ येथे महापालिका शाळेत महिलांसाठी एकदिवसीय लघु कालीन प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
महिला उद्योग व स्वयंरोजगार प्रशिक्षण ,आपत्ती निवारण व स्वसंरक्षण , आर्थिक साक्षरता , महिला कायदे , योगा व प्राणायाम इत्यादी विषयांवर श्रम मंत्रालयाचे विभागीय संचालक चन्द्रसेन जगताप, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, भारत सरकारच्या केंद्रीय कामगार विभागाचे सहसंचालक के.पी श्रीकुमार, समाज विकास अधिकारी एच/पुर्व-एच/प चे सुरेश पालवे, प्रशिक्षक बाळकृष्ण नानेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मुंबई महानगरपालिका समाज विकास विभागाचे समुदाय संघटक अनिल पवार व नम्रता जुवळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.