गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट आणि ‘मला सेम बाबा व्हायचंय…’ असं म्हणणाऱ्या त्याच्या मुलाची गोष्ट डॉ. सलील कुलकर्णी ‘एकदा काय झालं!!’च्या रूपात आपल्यासमोर घेऊन येत आहे. आज (ता. २५) या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. टीझरला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची अतुरतेने वाट बघत होते. ट्रेलरवरून वडिल-मुलाच्या नाजूक नात्याला या कथेतून स्पर्श केलेला दिसतो. तसेच गोष्ट प्रभावीपणे सांगणाऱ्या माणसाच्या आयुष्याचीच गोष्ट या चित्रपटातून साकारण्यात आल्याचेही ट्रेलरमध्ये स्पष्ट होत आहे.
अभिनेता सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे यांच्या मुख्य भूमिका आहेत. यांसोबतच मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले या कलाकारांनी आपल्या अभिनयाने चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच त्यातील गाण्यांचीही जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटातील विशेष बाब म्हणजे यातील एक अंगाई प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांनी गायली आहे.
डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशी तिहेरी कामगिरी केलेली आहे. विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचे मार्गदर्शन या चित्रपटाला लाभले आहे, तर त्यांचा मुलगा आणि संगीतकार सिद्धार्थ महादेवन, शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
‘एकदा काय झालं!!’ हा चित्रपट पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत करत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती गजवदन प्रॉडक्शन्सचे अरूंधती दात्ये, अनुप निमकर, नितीन प्रकाश वैद्य आणि डॉ. सलील कुलकर्णी तसेच शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रुंगारपुरे, सौमेंदु कुबेर आणि सिद्धार्थ खिंवसरा यांनी केली आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
Trailer Link
https://www.facebook.com/103135255782343/videos/1140031039885897