मुंबई, १३ जानेवारी : क्रिकेट प्रशिक्षक हेमू दळवी यांचे आज सकाळी ११ वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षाचे होते. गेले सहा महिने त्यांना दिवसातून तीन वेळा डायालीसीस करावे लागत होते. दहिसर येथे आपल्या मुली कडे ते राहात होते. संध्याकाळी दहिसर पश्चिम येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे झुनझुनवाला महाविद्यालयातील त्यांचे शिष्य बलविंदर सिंग संधू, रवी ठाकर, मृदुल चतुर्वेदी, अरविंद धुरी, प्रमोद साटम राजू शिर्के अशी क्रिकेटर मंडळी उपस्थित होती.
अलीकडेच झुनझुनवाला महाविद्यालयातील त्यांच्या शिष्यानी त्यांच्यासाठी आगळीवेगळी गुरुदक्षिणा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २०१९ मध्ये माय क्राफ्ट इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने सातारा येथील अपशिंगे (मिलिटरी) येथील क्रीडा संकुलात भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. तब्बल ३५ वर्षे प्रशिक्षणाच्या कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या दळवी सरानी ४ कसोटीवीर आणि ४० रणजी खेळाडू घडविले होते तसेच उच्च दर्जाचे राष्ट्रीय प्रशिक्षक देखील त्यांनी घडविले आहेत.