३७ व्या डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी-डीएई क्रीडा व कला महोत्सव अंतर्गत एलोरा ग्रुप निवड चाचणी बुध्दिबळ स्पर्धेत तिसऱ्या स्विस लीग सामान्याअखेर गोपाळ सुर्वे, रोनक गुप्ता यांनी अपराजित राहून साखळी ३ गुणांसह संयुक्त आघाडी घेतली. गतविजेत्या दीपक वाईकरला अमित प्रभालेने बरोबरीत रोखल्यामुळे दोघेही २.५ गुणासह द्वितीय स्थानाच्या संयुक्त आघाडीत आहेत. अॅटोमिक एनर्जी रिक्रिएशन क्लबतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने गेट वे ऑफ इंडिया येथील डीएई सभागृहात सुरु असलेल्या स्पर्धेमधील पहिले सहा खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
तिसऱ्या फेरीमधील पहिल्या पटावर बिगर मानांकित अमित प्रभालेने लंडन पद्धतीच्या डावात १३ व्या चालीला प्रथम मानांकित दीपक वाईकरवर विजय मिळविण्याची नामी संधी अतिसावध खेळामुळे वाया दवडली. प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर दीपक वाईकरने अप्रतिम बचाव करीत प्रतिस्पर्ध्याला २६ व्या चालीला बरोबरी करण्यास भाग पाडले. दुसऱ्या पटावर सिसिलियन डिफेन्सच्या डावात रोनक गुप्ताने २३ व्या चालीला द्वितीय मानांकित बाबाहिरू पंधरेला नमविले. तिसऱ्या पटावर गोपाळ सुर्वेने दहाव्या चालीपर्यंत जोरदार टक्कर देणाऱ्या हेमंत गुप्ताच्या राजाला १६ व्या चालीत जेरीस आणले. अन्य सामन्यात रक्तिम दासने अरुण वाटकरचा, मयुरकुमार भानुशालीने गणेश पाटीलचा, धर्मवीर सिंगने प्रतिक पोलाडियाचा तर अनिलकुमार नाईकने संकेत घोरपडेचा पराभव करून साखळी एक गुण वसूल केला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पंच सिध्देश थिक व चंद्रकांत करंगुटकर पंचाचे कामकाज पाहत आहेत.