मुंबई, १० जानेवारी २०२३: नॅशनल असोसिएशन ऑफ रिएल्टर्स (एनएआर)-इंडियाच्या सहाव्या वार्षिक एनएआर-इंडिया ऑलिम्पियाडचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आले आहे. माननीय खासदार श्री गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते ऑलिम्पियाडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एनएआर-इंडियाचे अध्यक्ष श्री समीर अरोरा आणि श्री रवी वर्मा उपस्थित होते. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील सर्व हितधारकांसाठी या ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले असून ९ ते ११ जानेवारी २०२३ दरम्यान ते संपन्न होईल. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील १५०० पेक्षा अधिक व्यक्ती या तीन दिवसीय उपक्रमात सहभागी होत आहेत.
एनएआर-इंडियाच्या शानदार क्रीडा महोत्सवाला सर्व सिटी असोसिएशन्सकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. या तीन दिवसीय महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कॅरम इत्यादी खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील सर्व उपस्थित सदस्य या स्पर्धांमध्ये आपली क्रीडा कौशल्ये प्रदर्शित करतील.
अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून स्थावर मालमत्ता उद्योगक्षेत्रातील सौहार्द आणि सुसंवाद मजबूत होते हा विचार डोळ्यासमोर ठेवून एनएआर-इंडिया वार्षिक एनएआर-इंडिया ऑलिम्पियाडचे आयोजन करते. सध्या संपूर्ण जगावर असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर निरोगी जीवनशैलीचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवले जावे हा देखील एनएआर-इंडियाचा उद्देश आहे.
ऑलिम्पियाडबद्दल माननीय खासदार श्री. गोपाळ शेट्टी यांनी सांगितले, “लोकांना फिट आणि सक्रिय ठेवण्याच्या दृष्टीने हे अतिशय सकारात्मक व उत्तम पाऊल उचलले गेले आहे असे मला वाटते. आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी देखील खेलो इंडिया सारख्या कार्यक्रमांना पाठिंबा देऊन देशबांधवांना निरोगी व सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. आज देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात जास्त योगदान देणाऱ्या उद्योगक्षेत्रांमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्राचा समावेश होतो आणि म्हणूनच या उद्योगक्षेत्रातील व्यक्तींसाठी अशाप्रकारचे मनोबल वाढवणारे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारे उपक्रम आवश्यक आहेत. आपणां सर्वांना माझ्यातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा आणि या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.”
एनएआर – इंडियाचे अध्यक्ष श्री. समीर अरोरा यांनी या प्रसंगी सांगितले, “जी टीम एकत्र काम करते ती टीम उत्तम कामगिरी बजावते आणि उत्तम परिणाम घडवून आणते. त्यामुळे सांघिक भावना विकसित करण्यासाठी आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा उपक्रमांचे आयोजन आपल्या समुदायाच्या कल्याणासाठी खूप उपयुक्त आहे. या क्षेत्राच्या आणि येथील लोकांच्या कल्याणासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू.”