मुंबई : 37 व्या डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी क्रीडा व कला महोत्सव अंतर्गत एलोरा ग्रुप निवड चाचणी बुध्दिबळ स्पर्धेत प्रथम मानांकित दीपक वाईकर, द्वितीय मानांकित बाबा पंधरे, किशोर मोरे, अनिलकुमार नाईक यांनी सलामीचे स्विस लीग सामने जिंकले. स्पर्धेचे उद्घाटन अॅटोमिक एनर्जी कमिशनचे सेक्रेटरी सुनील गंजू यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, रिक्रिएशन क्लबचे सेक्रेटरी संजय सकपाळ, मंगलमाला भालेराव, लता दाभोळकर आदी मंडळी उपस्थित होती.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने सुरु झालेल्या बुध्दिबळ स्पर्धेत पहिल्या पटावर गतविजेत्या दीपक वाईकरने हत्ती व वजिराच्या सहाय्याने अचूक डावपेच रचत सुरजित कुमारच्या राजाला १८ व्या चालीत जेरीस आणले. दुसऱ्या पटावर बाबा पंधरेने ३५ व्या चालीला एम. वेंकटेशनच्या राजाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. तृतीय मानांकित धर्मवीर सिंगचा पराभव करतांना किशोर मोरेने ४२ वी राणीची चाल विजयी रचली. अन्य सामन्यात अनिलकुमार नाईकने मयूरकुमार भानुशालीचा, गणेश पाटीलने नेहा चव्हाणचा, रक्तिम दासने प्रतिक पोलाडियाचा, अमित प्रभालेने निलेश देशपांडेचा तर संकेत घोरपडेने विक्रम राथोरेचा पराभव करून पहिला साखळी गुण मिळविला.
******************************