Borivali-Thane Twin Tunnel: घोडबंदर रस्त्यावरील प्रचंड वाहतूककोंडी टाळून बोरीवली ते ठाणे असा प्रवास अवघ्या वीस मिनिटांत करणे शक्य होणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून ठाणे ते बोरिवली दरम्यान दोन भुयारी मार्ग (ट्विन ट्युब बोगदा) खोदून वाहतुकीचा हा नवा पर्याय खुला करण्यासाठी ‘एमएमआरडीए’कडून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
ठाणे हद्दीत या प्रकल्पाची लांबी पाच किमी असून सरासरी रुंदी ७० मीटर आहे. या प्रकल्पासाठी ३४ हेक्टर जमीन बाधित होणार होती. या भागातील आरक्षित जागांचे आरक्षणही ठाणे महापालिकेकडून बदलण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. प्रारंभी अवघ्या ३ हजार कोटी रुपयांच्या मूळ प्रकल्पावर वन विभागाच्या जागेच्या मोबदल्यात पर्यायी जागा देण्याची अट असल्यामुळे या प्रकल्पाचा खर्च ११ हजार कोटींपर्यंत वाढला आहे. मान्सूनपूर्वी काम सुरू करून पुढील चार वर्षांत ते पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ठाण्यातील टिकूजी-नी-वाडी ते बोरीवली मागाठाणे २४ किमी अंतर वाहनाने पूर्ण करण्यासाठी सध्या एक ते दीड तास लागत आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या खालून भुयारी मार्गाने हे अंतर ११.८४ किमी इतके कमी होऊ शकणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास १५ ते २० मिनिटे इतका कमी होऊ शकणार आहे. यामध्ये १०.८ किमी लांबीचे दोन भुयारी मार्ग असून त्यांना शहरातील रस्त्यांवर जोडण्यासाठी जोडरस्ते तयार केले जाणार आहेत. बोरिवली-मागाठाणे-एकता नगरमधून ठाणे मानपाडा येथील टिकुजी-नी-वाडी जवळ हा भुयारी मार्ग तयार होणार आहे. प्रत्येक भुयारामध्ये तीन मार्गिका अशा दोन्ही भुयारांमध्ये एकूण सहा मार्गिका असतील.
अडथळ्यांची शर्यत
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा प्रकल्प जात असला तरी पर्यावरणप्रेमींकडून त्यावर हरकती आणि आक्षेप घेतले जात आहेत. हा बोगदा जात असलेल्या भागाच्या भूभागावरील जमीनमालकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येऊर परिसरातील अदिवासींचा पुनर्विकास रखडण्याची भीती व्यक्त होत आहे. पर्यावरणीयदृष्ट्या आवश्यक परवानग्यांचे मोठे आव्हान या प्रकल्पासमोर आहे. ‘एमएमआरडीए’कडे भुयारी मेट्रो प्रकल्पामुळे भुयारी मार्ग खोदण्याची अत्याधुनिक यंत्रणा हाती असली तरी अभयारण्याच्या क्षेत्रातील जैवविविधता राखून हा प्रकल्प पूर्ण करणे कठीण आहे.