मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक आंतर शालेय कॅरम स्पर्धेत वरळीच्या मराठा हायस्कूलने विजेतेपद पटकाविले. सिमरन शिंदे व सुजल मोरे यांच्या विजयी खेळामुळे मराठा हायस्कूलने पार्ले टिळक विद्यालयाचा २-१ असा चुरशीचा पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. सार्थक केरकरने पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही पार्ले टिळक विद्यालयाला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील तृतीय क्रमांक गणपतराव कदम मार्ग मुंबई पब्लिक स्कूलने तर चतुर्थ क्रमांक कल्याणच्या सेंट थॉमस हायस्कूलने मिळविला. माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, कॅरमप्रेमी महेश शेटे, कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत पारितोषिक विजेत्यांना गौरविण्यात आले.
माहीम ज्युवेनील स्पोर्ट्स क्लब, अविनाश स्पोर्ट्स व एस.एस. कॅरम अकॅडमी यांच्या सहकार्याने झालेल्या मोफत मार्गदर्शनासह शालेय कॅरम स्पर्धेची अंतिम लढत मराठा हायस्कूल विरुद्ध पार्ले टिळक विद्यालय यामध्ये शिवाजी पार्क येथे चुरशीची झाली. सिमरन शिंदेने ओम सुतारवर २५-० असा विजय मिळवीत मराठा हायस्कूलला १-० अशी आघाडी दिली तर पार्ले टिळक विद्यालयाच्या सार्थक केरकरने रिशभ मालवणकरचा ६-४ असा पराभव करून १-१ अशी साधली. निर्णायक सामन्यात सुजल मोरेने मंदार पालकरला १८-१ असे हरवून मराठा हायस्कूलच्या विजेतेपदावर २-१ असा शिक्कामोर्तब केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात मराठा हायस्कूलने सुजल मोरे व सिमरन शिंदे यांच्या विजयामुळे गणपतराव कदम मार्ग मुंबई पब्लिक स्कूलचा २-१ असा तर पार्ले टिळक विद्यालयाने सार्थक केरकर, मंदार पालकर व ओम सुतारच्या विजयामुळे सेंट थॉमस हायस्कूलचा ३-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.