MUMBAI ; आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल बी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेचा तृतीय पुरस्कार पटकाविताना सेव्हन हिल्स हॉस्पिटलने रहेजा हॉस्पिटलचा २२ धावांनी पराभव केला. सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला विजयासाठी स्वप्नील शिंदे, रोहित सोमार्डे, अमोल तोरस्कर, डॉ. मनोज यादव यांचा खेळ उपयुक्त ठरला. परिणामी अविनाश डांगळे, चेतन सुर्वे यांनी छान खेळ करूनही रहेजा हॉस्पिटलला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेप्रसंगी रुग्णालयीन क्रिकेटपटू धर्मेश स्वामी, अंकुश जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ओम्नीचे संचालक ओमकार मालडीकर, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळाडूंना गौरविण्यात आले.
तृतीय क्रमांकाच्या नवरोज-आझाद मैदानावरील सामन्यात रोहित सोमार्डे ( २४ धावा), अमोल तोरस्कर (२२ धावा), डॉ. मनोज यादव यांच्या दमदार फलंदाजीमुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाने ६ बाद ९२ धावांचा टप्पा गाठला. सुरुवातीला अविनाश डांगळे (१४ धावा), चेतन सुर्वे (१२ धावा), नितेश म्हस्के (११ धावा) यांच्या फलंदाजीमुळे रहेजा हॉस्पिटलला विजयी लक्ष्य सोपे झाले होते. परंतु स्वप्नील शिंदेच्या (५ धावांत ५ बळी) प्रभावी गोलंदाजीमुळे रहेजा हॉस्पिटलचा डाव सेव्हन हिल्स हॉस्पिटलने अवघ्या ७० धावसंख्येवर गुंडाळला आणि तृतीय स्थानी झेप घेतली. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार स्वप्नील शिंदे व अविनाश डांगळे यांनी पटकाविला. रुग्णालयीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटपटू ओमकार मालडीकर यांनी १ फेब्रुवारीपासून ओम्नी ट्रॉफी इंटर हॉस्पिटल चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धा तर क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते यांनी १ मार्चपासून अमृत महोत्सवी आरएमएमएस ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा जाहीर केल्या आहेत.