Actionपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज अॅक्शन सीन नायक नायिकेमधील रोमान्स आणि त्याला खटकेबाज संवादाची फोडणी अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि Actionचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘सुर्या’ हा चित्रपट ६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स, डीके निर्मित ‘सुर्या’ या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. असत्याविरुद्ध सत्याचा लढा, त्याला नायक-नायिकेच्या प्रेमाची फोडणी ‘मनोरंजनाचं पॅकेज’ असलेल्या ‘सुर्या’ या चित्रपटातून प्रेमाचा त्रिकोण ही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. प्रसाद मंगेश, रुचिता जाधव, देवशी खंडुरी हे युवा चेहरे या चित्रपटात दिसणार आहेत.
सळसळत्या रक्ताचा आणि तळपत्या ज्वालांचा अंगार.. ‘सुर्या’… अशा जबरदस्त टॅग लाईनसह प्रसाद मंगेश हा नवोदित अभिनेता या चित्रपटात नायकाच्या रूपात आपला धमाका दाखविण्यास सज्ज झाला आहे. ACTION ने ठासून भरलेला’ ‘सुर्या’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग ‘सुर्या’ आलेल्या संकटावर कशी मात करतो याची रंजक कथा दाखवतानाच मैत्रीचं अबोल नातं जपणारी रिया आणि सुर्याच्या प्रत्येक लढ्यात त्याची ढाल बनून राहणारी काजल या दोघींच्या प्रेमाचे रंग यात पहायला मिळणार आहेत. या तिघांसोबत हेमंत बिर्जे, उदय टिकेकर, अखिलेंद्र मिश्रा, गणेश यादव, संदेश जाधव, पंकज विष्णू, हॅरी जोश, अरुण नलावडे, संजीवनी जाधव, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बोऱ्हाडे, प्रदीप पटवर्धन, दिलीप साडविलकर, जसबीर थंडी आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
‘सुर्या’ चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम, मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. तर नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांचे आहेत. बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संजय मिश्रा, देव चौहान यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. अॅक्शन डिरेक्टर अब्बास अली मोघल आणि मोझेस फर्नांडिस आहेत.या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली असून सह निर्मिती प्रसाद मंगेश, चेतन मंगेश यांची आहे. कार्यकारी निर्माते संग्राम शिर्के आहेत.