मीरपूर : टीम इंडियाने मीरपूर कसोटीत बांगलादेशवर संघर्षपूर्ण विजय नोंदवला. भारताने यजमानांचा 3 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिका 2-0 अशी जिंकली आहे. भारताने चौथ्यांदा बांगलादेशचा क्लीन स्वीप केला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताला 55.77% गुण आहेत. 76.92% गुणांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे.
रविवारी चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात श्रेयस-अश्विनच्या अर्धशतकी भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने 7 विकेट्सवर आवश्यक धावा केल्या. तिसऱ्या दिवशी नाबाद अक्षर पटेल 34 धावा करून बाद झाला. तर नाईट वॉचमन जयदेव उनाडकट 13 धावा करू शकला. या दोघांशिवाय ऋषभ पंतने 9 धावा जोडल्या. श्रेयस अय्यर आणि अश्विनने 71 धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने 5 बळी घेतले. कर्णधार शकिब अल हसनला 2 यश मिळाले.
बांगलादेशने दुसऱ्या डावात 231 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य दिले. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात 314 आणि बांगलादेशने 227 धावा केल्या होत्या.
टीम इंडियाने पहिली कसोटी 188 धावांनी जिंकली होती.
मीरपूर येथे रंगलेल्या भारत-बांगलादेश यांच्यातील रोमांचक दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर आणि आर. अश्विनने झुंजार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तीन गडी राखून पराभव केला. त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी (रविवार) ७ गडी गमावून १४५ धावांचे लक्ष्य गाठले. यासह भारताने बांगलादेशचा दोन सामन्यांच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले.
भारताच्या दुसऱ्या डावात झटपट विकेट्स पडत असताना आर अश्विन, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी उल्लेखीय फलंदाजी केली. खासकरून श्रेयस अय्यर आणि आर. अश्विन या दोघांनी नाबाद ७१ धावांची विजयी भागीदारी केली. आठव्या गड्यासाठी यांच्यात झालेल्या भागीदारीने अनेक विक्रम मोडले. त्यात त्यांनी एल अमरसिंग – लाल सिंग यांच्या ७४ धावांच्या इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर १९३२ (पहिली कसोटी) साली केलेल्या भागीदारीला मागे टाकले. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध १९८५ साली भारताचे विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार अष्टपैलू खेळाडू कपिल देव आणि एल शिवरामकृष्णन यांच्या ७० धावांचा विक्रम देखील मोडला.
दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या अशा प्रकारे विकेट पडल्या
पैहीली विकेट : तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शकीबने राहुलला विकेटच्या मागे नुरूलकरवी झेलबाद केले.
दुसरी विकेट : 8व्या षटकात मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर पुजाराला नुरूलने यष्टिचित केले.
तिसरी विकेट : 14व्या षटकात मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर नुरुल हसनने शुभमन गिलला यष्टिचित केले.
चौथी विकेट : 20व्या षटकात मेहदी हसन मिराजने मोमिनुल हककरवी झेलबाद केले.
पाचवी विकेट : शाकिबने जयदेव उनाडकटला LBW केले.
सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर अश्विनने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “आमच्याकडे फारशी फलंदाजी शिल्लक नव्हती. हा असा सामना होता जिथे एक चूक आणि सामना हातातून निसटू शकत होता. श्रेयसने शानदार फलंदाजी केली. काहीवेळा या परिस्थितींमध्ये असे वाटते की अनेक गोष्टी डोक्यात ठेऊन पुढे जावे लागेल, त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि मला वाटते की आम्हाला आमच्या बचावावर आणखी काम करणे गरजेचे आहे. श्रेयसची फलंदाजी आवडली. इथल्या खेळपट्ट्या खूप चांगल्या आहेत. पण मला वाटलं की बॉल खूप लवकर सॉफ्ट झाला. बांगलादेशला खरोखर श्रेय दिले पाहिजे, त्यांनी काही क्षणी आमच्यावर थोडा जास्तच दबाव आणला.” अश्विन पुढे म्हणतो, “जर श्रेयस अय्यर प्लेअर ऑफ द सीरीज नसता, तर मी माझा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार त्याच्यासोबत शेअर केला असता, त्याने अप्रतिम फलंदाजी केली.”
बांगलादेशला चारीमुंड्या चित केल्यानंतर श्रेयस अय्यरने ही आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, “ ज्यावेळी भारताच्या एकापाठोपाठ एक विकेट्स पडत होत्या त्यावेळी मी फक्त एका ४० ते ५० धावांच्या भागीदारीचा विचार करत होतो. अक्षर बाद झाल्यानंतर मी अश्विनला मदतीला घेतले. मी त्याला म्हणालो आपण षटकात एक मोठा मारायचा आणि मग स्ट्राईक रोटेट करायची. जेणेकरून त्यांचे गोलंदाज सेट होणार नाहीत आणि क्षेत्ररक्षक आपल्यापासून लांब जातील. ठरवलेल्या प्लानप्रमाणे आम्ही खेळत गेलो आणि जेव्हा ५० पेक्षा कमी धावा विजयासाठी हव्या होत्या तेव्हा मात्र आम्ही अधिक आक्रमक होऊन फटके खेळण्यास सुरुवात केली.”
२०२२ या वर्षात श्रेयस अय्यरने शानदार कामगिरी केली
२०२२ या वर्षात श्रेयस अय्यरने शानदार कामगिरी केली आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून त्याने ३९ डावात ४७.८७ च्या सरासरीने १५८० धावा केल्या. त्यात एका शतकाचा समावेश आहे. बाबर आझम, लिटन दास, मोहम्मद रिझवान हे तीन फलंदाज त्याच्या पुढे आहेत तर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला त्याने मागे टाकले आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या बाबतीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर
अष्टपैलू खेळाडूंच्या बाबतीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने आत्तापर्यंत ३००० धावा आणि ४४७ बळी घेतले आहेत. तो या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून शॅान पोलाक, कपिल देव, स्टुअर्ड ब्रॉड आणि शेन वॉर्न यांना त्याने मागे टाकले आहेत, तर रिचर्ड हेडली त्याच्या पुढे आहे.