मुंबई, : शिवनेरतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, अभ्युदय स्पोर्ट्स व यशस्विनी योजना सहकार्याने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विनाशुल्क शालेय सुपर लीग कबड्डीचे विजेतेपद अँटोनिओ डिसोझा हायस्कूल-भायखळा संघाने पटकाविले. निर्णायक सामन्यात डिसोझा हायस्कूलने सरस्वती विद्या मंदिर-भटवाडी संघाचा ३५ गुणांनी पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. अफॅक इंग्लिश स्कूल-चेंबूर संघाने ताराबाई मोडक हायस्कूल-दादर संघाचा २७ गुणांनी पराभव करून तृतीय क्रमांक मिळविला. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, राष्ट्रीय कबड्डीपटू-प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कारासह गौरविण्यात आले.
बांदल क्रीडांगण-डॉकयार्ड येथे झालेल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या निर्णायक लढतीमध्ये अष्टपैलू सक्षम सूर्यवंशी व हर्ष शेरकर यांच्या अप्रतिम खेळामुळे डिसोझा हायस्कूलने सरस्वती विद्या मंदिरचा ६१-२६ असा मोठा पराभव केला. कप्तान साहिल वाघमारे व साहिल सोलंकर यांना उशिरा सूर सापडल्यामुळे सरस्वती विद्या मंदिरला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांकाच्या लढतीमध्ये अफॅक स्कूलच्या एन्गीलेश यादवच्या चढाया रोखता न आल्यामुळे ताराबाई मोडक हायस्कूलने ५९-३२ असा पराभव पत्करला. स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू कबड्डीपटूसाठी सक्षम सूर्यवंशी, उत्कृष्ट चढाईसाठी एन्गीलेश यादव तर उत्कृष्ट पकडीसाठी साहिल सोलंकर यांनी पुरस्कार पटकाविला. याप्रसंगी षष्ठब्दीपूर्तीनिमित्त राष्ट्रीय प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी यांचा सुवर्णपदक, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन शिवनेर व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे त्यांच्या गौरवशाली कबड्डी कारकीर्दीचा गौरव करण्यात आला.