दादर येथील नायगाव परिसरात कोहिनूर मिल्स परिसरात वास्तव्यास आलेल्या पाणमांजराचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. मुंबईतील नैसर्गिक जलस्त्रोतात पाणमांजराचा वावर नसताना पाणमांजर अवैध विक्रीतून मुंबईत आल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. चायनीज अन्नपदार्थ खाण्याची सवय लागलेल्या पाणमांजराला रात्री पकडून जेरबंद केल्यानंतर प्रवासादरम्यान पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान पाणमांजराचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाबाबत वनविभागाने अद्याप कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
काय आहे नेमकी घटना ?
गेल्या महिन्याभरापासून नायगाव परिसरातील कोहिनूर मिल्स जागेत स्थानिकांना पाणमांजर दिसत होते. पाणमांजर सायंकाळी उशिराने मिल्सबाहेर चायनीज अन्नपदार्थ विकणा-या स्टॉल्सजवळ यायचे. हा प्रकार सतत होत असल्याने स्थानिक चांगलेच धास्तावले. सुरुवातीला सरपटणारा प्राणी नेमका कोणता, हेच त्यांना समजत नव्हते. पाणमांजर मिल्समध्ये वास्तव्य करु लागले. तिथल्या पाण्याचा साठा तसेच उपलब्ध अन्नावर पाणमांजर राहत होते. सायंकाळी किंवा रात्री मिल्सजवळ माणसांची वर्दळ कमी झाली की रस्त्यावर यायचे. शनिवारी रात्री पाणमांजर एका चाळीत शिरले. या चाळीतून पाणमांजराला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या प्राणीप्रेमी सदस्यांनी प्रयत्न केला असता चार सदस्यांना पाणमांजराने चावले. त्यापैकी एकाला रुग्णालयात दाखल करावे लागले. चाळीतून पाणमांजराला पकडल्यानंतर त्याला वाहनात ठेवल्यानंतर प्रवासादरम्यान त्याला श्वसनास त्रास होत असल्याने असोसिएशनच्या सदस्यांनी परळ येथील बैलघोडा रुग्णालय गाठले. पशुवैद्यकीय अधिका-यांनी त्याला तपासणीदरम्यान मृत घोषित केले. पाणमांजराला बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले गेले. शवविच्छेदन अहवाल प्रलंबित असून या संपूर्ण प्रकरणाबाबत वनविभागाने जाहीर भूमिका घेण्याची मागणी केली जात आहे.