तब्बल सहा दशकांहून अधिक काळ आपल्या गायनानं रसिक श्रोत्यांच्या काना-मनावर मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका, महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी, ‘पद्मश्री’ सुलोचना चव्हाण यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचनाबाईंच्या निधनामुळं चित्रपटसृष्टीसह राज्यातील सांस्कृतिक क्षेत्रात दु:ख व्यक्त होत आहे. सुलोचनाबाईंच्या रूपानं लावणीची नजाकत हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.काही महिन्यांपूर्वी घरात घसरून पडल्यामुळं त्यांच्या कमरेचं हाड मोडलं होतं. त्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अखेर आज फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मरिन लाइन्स येथील स्मशानभूमीत दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
ठेका आणि ठसका
सुलोचना चव्हाण यांनी मराठी चित्रपटांमध्ये शेकडो गाणी गायली. ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा…’ ‘पदरावरती जरतारीचा’… ‘सोळावं वरीस धोक्याचं’… ‘कसं काय पाटील बरं हाय का?’… यासारख्या अनेक गाण्यांनी महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं. आजही लावणी किंवा महाराष्ट्राच्या लोककलेशी संबंधित कुठलाही कार्यक्रम सुलोचनाताईंचा आवाज कानावर पडल्याशिवाय पूर्ण होत नाही. लावणी आणि सुलोचना चव्हाण हा समानार्थी शब्दच जणू बनला होता. त्यांच्या गाण्यातील ठसका आणि नजाकत पुन्हा पुन्हा ऐकावीसी वाटे. गाण्यातले सगळे भाव उलगडून दाखवण्याची किमया त्यांच्या आवाजात होती. काही हिंदी चित्रपटांतही त्यांना गायनाची संधी मिळाली. हिंदीत त्यांनी गायलेल्या गाण्यांमध्ये ‘चोरी चोरी आग सी दिल मैं लगाके’, ‘मौसम आया है रंगीन’ अशा गाण्यांचा समावेश आहे. पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारनं सुचोलना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं होतं. त्याशिवाय, इतरही अनेक सन्मान त्यांना लाभले होते.