मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल बी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करतांना जसलोक हॉस्पिटलने सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे आव्हान २३ धावांनी संपुष्टात आणले. अष्टपैलू नितीन सोळंकी, रोहित जाधव, सचिन तोडणकर, अनिकेत कुटे यांच्या अप्रतिम खेळामुळे जसलोक हॉस्पिटल संघाचा विजय सुकर झाला. रोहित सोमार्डे, सुशांत गुरव, डॉ. इब्राहीम शेख यांनी ६ बाद १०२ धावांची उत्तम स्थिती निर्माण करूनही सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला पराभव पत्करावा लागला. नितीन सोळंकी व रोहित सोमार्डे यांना उपांत्य सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर यांनी गौरविले.
जसलोक हॉस्पिटलने अष्टपैलू सचिन तोडणकर (२२ चेंडूत ३६ धावा), अनिकेत कुटे (२९ चेंडूत २५ धावा), रोहित जाधव (२० चेंडूत २१ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे मर्यादित २० षटकात ९ बाद १३२ धावा फटकाविल्या. सुशांत गुरव (११ धावांत २ बळी), विशाल सावंत (२८ धावांत २ बळी), डॉ. हर्षद जाधव ( १७ धावांत १ बळी) आदींनी छान गोलंदाजी केली. विजयी धावांचा पाठलाग करतांना सेव्हन हिल्स हॉस्पिटलची सुरुवात ५ बाद ३२ धावा अशी निराशाजनक झाली. तरीही न डगमगता अष्टपैलू सुशांत गुरव ( १९ चेंडूत २० धावा), रोहित सोमार्डे (२९ चेंडूत ४० धावा) व डॉ. इब्राहीम शेख ( १९ चेंडूत १८ धावा) यांनी सेव्हन हिल्स हॉस्पिटलला (६ बाद १०२ धावा) विजयासमीप नेले. परंतु नितीन सोळंकी (१५ धावांत ५ बळी), प्रसाद पाटील (१७ धावांत २ बळी), सचिन तोडणकर (११ धावांत १ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीने अखेर सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा डाव १९ व्या षटकाला १०९ धावसंख्येवर गुंडाळला. परिणामी जसलोक हॉस्पिटलने २३ धावांच्या विजयासह फायनलमध्ये धडक मारली.