मुंबई : – अष्टपैलू फरहान काझी, ओंकार जाधव, प्रतिक पाताडे, विजय बागडे यांच्या अप्रतिम खेळामुळे नानावटी हॉस्पिटलने रहेजा हॉस्पिटलचा ८ विकेटने पराभव केला आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल बी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. फरहान काझीला सामनावीर पुरस्काराने शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व क्रिकेटपटू चेतन सुर्वे यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
नवरोज-आझाद मैदानावर सलामीवीर सचिंद्र ठाकूर (४३ चेंडूत २७ धावा) व चेतन सुर्वे (२० चेंडूत १५ धावा) यांनी रहेजा हॉस्पिटलला १ बाद ४८ धावा अशी उत्तम सुरुवात करून देऊनही नानावटी हॉस्पिटलच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांचा डाव १९.१ षटकात अवघ्या ७६ धावसंख्येवर गुंडाळला. फरहान काझी (५ धावांत ३ बळी), प्रतिक पाताडे (९ धावांत २ बळी), विजय बागडे (६ धावांत २ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. विजयी लक्ष्य आटोक्यात राहिल्यामुळे सलामीवीर ओंकार जाधव (२९ चेंडूत २९ धावा) व फरहान काझी (२० चेंडूत नाबाद २४ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी केली. परिणामी नानावटी हॉस्पिटल संघाने ११.२ षटकात २ बाद ७७ धावा फटकावून विजयावर शिक्कामोर्तब केला.
*****************