मुंबई : ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल बी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये रहेजा हॉस्पिटल विरुध्द नानावटी हॉस्पिटल आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटल विरुद्ध जसलोक हॉस्पिटल यामध्ये चुरशीची सेमी फायनल ९ डिसेंबर रोजी नवरोज-आझाद मैदानात रंगणार आहे. माजी विजेते नानावटी हॉस्पिटल व जसलोक हॉस्पिटल संघ बी डिव्हिजनचे विजेतेपद पटकाविण्याच्या संभाव्य दावेदारीत असले तरी त्यांना प्रतिस्पर्धी संघांचे सेमी फायनलमधील आव्हान सोपे नसेल.
रुग्णालयीन क्रिकेटमध्ये नानावटी हॉस्पिटलचे दिनेश पवार, ओंकार जाधव यांच्यासह शेवटपर्यंत फलंदाजी मजबूत आहे. तसेच अष्टपैलू प्रतिक पाताडे, नितीन रांजे, संदीप गुरव, विशाल चतुर्वेदी यांची गोलंदाजीदेखील प्रभावी ठरली आहे. त्यामुळे नानावटी हॉस्पिटलचे सेमी फायनलमधील रहेजा हॉस्पिटल संघाला असलेले आव्हान पेलण्यासाठी सचिन ठाकूर, विजय वैती, दीपक काळे, चेतन सुर्वे आदी क्रिकेटपटू पूर्ण तयारीनिशी सज्ज आहेत.
दुसऱ्या सेमी फायनलमध्ये जसलोक हॉस्पिटलचे सलामीवीर श्रीकांत दुधवडकर, नितीन सोळंकी, प्रवीण मोरजकर, दीपक रत्नापुरकर, प्रसाद पाटील विरुद्ध सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे डॉ. हर्षद जाधव, रोहित सुमार्डे, सुशांत गुरव, विशाल सावंत, मारीओ फर्नांडीस, सुरज घोलप यांच्या कामगिरीवर फायनलमधील कामगिरीवर फायनलमधील प्रवेश अवलंबून राहील. स्पर्धेदरम्यान रुग्णालयीन क्रिकेटमध्ये योगदान देणारे डॉ. स्वप्नील निसाळ यांचा सत्कार ओम्नी कंपनीचे डायरेक्टर ओमकार मालडीकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला.