कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त शालेय संघांची विनाशुल्क सांघिक कॅरम स्पर्धा २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान मोफत कॅरम प्रशिक्षणासह आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आली आहे. अविनाश स्पोर्ट्स, एस.एस. कॅरम अकॅडमी व स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन यांच्या सहकार्याने वरळी येथे होणाऱ्या कॅरम स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार तसेच त्यामधील सर्व खेळाडूंना स्ट्रायकरचा पुरस्कार देऊन कॅरमप्रेमी अविनाश नलावडे गौरविणार आहेत.
स्व. प्रल्हाद नलावडे यांनी स्थानिक पातळीवरील उदयोन्मुख कॅरम खेळाडूंना मोफत कॅरम स्ट्रायकर देत प्रोत्साहन दिले होते. विशेषतः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीमार्फत झालेल्या विक्रमी प्रवेशाच्या पहिल्या मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेमधील बहुतांश खेळाडूंना त्यांनी विनाशुल्क कॅरमचे स्ट्रायकर दिले होते. त्यावेळी त्यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी तसेच शेकडो पालक वर्गाने विशेष कौतुक केले होते.
सदर स्पर्धेत प्रत्येक फेरीमध्ये तीन एकेरी सामने होऊन दोन एकेरी सामने जिंकणारा संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरेल. मुले-मुली किंवा मिश्र अशा चार खेळाडूंचा शालेय संघ राहील. सहभागी उदयोन्मुख खेळाडूंना नामवंत तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन स्पर्धेदरम्यान लाभणार असल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली. इच्छुक शालेय कॅरम संघांनी मोफत प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी कॅरमपटू-प्रशिक्षक सचिन शिंदे (७३०२४ ९७४५८) अथवा कॅरम संघटक चंद्रकांत करंगुटकर (९९८७८३१६२२) यांच्याकडे ८ डिसेंबरपर्यंत संपर्क साधावा.