मुंबई : उध्दव ठाकरेंची शिवसेना पक्षाने गटप्रमुखांचा मेळावा घेतल्यानंतर रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्याच जागेत मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा घेतला. मात्र, या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी दादू म्हणजे आपल्या बंधू उध्दव ठाकरे यांच्याच पावलावर पाऊल ठेवल्याचे दिसून आले आहे. उध्दव ठाकरे यांनी गटप्रमुखांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय मुद्दे आणि भाजप व राज्यातील सरकारवर टिका केली, तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गटाध्यक्षांना अपेक्षित मार्गदर्शन करण्याऐवजी राष्ट्रीय पक्षांसह इतर पक्षांचा समाचार घेण्यातच अधिक वेळ घालवला. त्यामुळे जमलेल्या गटाध्यक्षांच्या ज्ञान गंगाजळी काहीच भर पडली नाही. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटाध्यक्षांमध्ये पुन्हा ताकदीने लढण्याची आणि जिद्दीने काम करण्याची हिंमत देण्याऐवजी राज ठाकरे यांनी इतर विषयांवरच अधिक भाष्य केल्याने गटाध्यक्षांमध्येच नाराजी पसरल्याचे पहायला मिळत आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिन्यांपूर्वीच मुंबईतील सर्व गटाध्यक्षांचा मेळावा २७ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार रविवारी गोरेगाव नेस्कोच्या प्रांगणात मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा संपन्न झाला. यापूर्वी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा २१ सप्टेंबर २०२२ रोजी झाला होता. मनसेच्या या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाने यापूर्वी केलेल्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित गटाध्यक्षांना पक्षाने यापूर्वी केलेल्या आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा दिला. याबरोरबच गटाध्यक्षांनी आपले काम चोख करावे आणि कोण कामचुकार करत असेल तर मला सांगा, मी त्यांना बघून घेईल,असे सांगितले. मला माझ्या भोवती हुजऱ्यांची गर्दी नको असे सांगत येणाऱ्या निवडणुकीत जी जबाबदारी मिळेल ती जोरकसपणे पार पाडा, मी तुम्हाला शब्द देतो, हा राज ठाकरे महापालिका जिंकून तुमच्या हाती देईल.
राज ठाकरे यांनी गटाध्यक्षांच्या या मेळाव्यात इतर मुद्दयांना हात घालण्याऐवजी गटाध्यक्षांकडून आपल्याला काय अपेक्षित काम सुरु आहे, कोणत्या नागरि कामांसाठी काय प्रयत्न केले पाहिजे, शाखा नसतील तरीही गटाध्यक्षांचे काम त्या मतदार केंद्राच्या हद्दीत कसे चालले पाहिजे, लोकांसाठी कायमच मनसैनिक कशाप्रकारे हजर राहिला पाहिजे, शिवसैनिकांपेक्षा मनसैनिक हा जनतेला कसा जवळचा वाटला पाहिजे,त्यांचा विश्वास संपादन करण्याच्यादृष्टीकोनातून कोणती कामे केली पाहिजे, कोणत्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, ज्या शाखाध्यक्षांना शाखा खुल्या करण्यास जागा नसतील तर त्यांनी शाखा पुन्हा उभ्या राहतील यासाठी पक्ष कशाप्रकारे शाखाध्यक्षांना मदत करेल. गटाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष यांची आठवड्याला कशाप्रकारे बैठका व्हायला पाहिजे, प्रत्येक शाखांमध्ये मी कधीही अचानक भेट देईन किंवा ऑनलाईनद्वारे आपल्या संपर्कात राहिन, गटाध्यक्षांनी मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रत्येक घर कशाप्रकारे पिंजून काढले पाहिजे, मनसेकडे जनता आकर्षिक होणारी असली तरी जनतेच्या संपर्कात आपला कार्यकर्ता नाही, त्यामुळे जनतेपासून मनसैनिकांनी नॉट रिचेबल न राहता रिचेबल राहण्याचा सदैव प्रयत्न करावा अशाप्रकारच्या मार्गदर्शनाची मनसैनिकांची अपेक्षा होती. परंतु पक्षाच्या जुन्या आंदोलनाची आठवणींना उजाळा देताना अन्य विषयांना हात घातल्याने गटाध्यक्षांना अपेक्षित मार्गदर्शन होऊ शकले नाही,अशाप्रकारच्या भावना गटाध्यक्षांकडून खासगी ऐकायला मिळत आहेत.
यापूर्वी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा याच जागेत झाला होता,त्या मेळाव्यात पक्षप्रमुख असलेल्या उध्दव ठाकरे यांनी द्विधा अवस्थेत असलेल्या गटप्रमुखांना योग्यप्रकारचे मार्गदर्शन करण्याऐवजी राष्ट्रीय मुद्दे आणि इतर पक्ष तथा व्यक्तींवर टिका करत मेळाव्याच्या मुळ हेतुलाच हरताळ फासला होता. आईला गिळणारी अवलाद, ढोकळा, वडापाव, कमळाबाई, वंशवाद, घराणेशाही आदींचा समाचार घेत कोविड काळात केलेल्या राज्य सरकार आणि महापालिकेच्या कामांचे कौतुक केले. त्यामुळे जे गेले ते मागचाच निवडणुकीत पडले,असे सांगत डबके मोकळे झाले आता नव्याने कामाला लागा असाच संदेश दिला. त्यामुळे इतरांवर टिका करून केवळ आपल्या गटप्रमुखांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करू न शकलेल्या उध्दव ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनी आपल्या गटाध्यक्षांना जाताना काही विचार दिले नाही. त्यामुळे गटाध्यक्षांची मोट बांधण्यासाठी काही भागांमध्ये शाखाध्यक्ष सक्षम नाही तर काही भागांमध्ये विभाग अध्यक्षच सक्षम नसल्याने मोठ्या नेत्यांवर लोकसभा क्षेत्रांची जबाबदारी सोपवून प्रत्येक शाखांचा आढावा घेण्यास भाग पाडले जावे अशाप्रकारच्या भावना मनसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे.