मुंबई (Mumbai) : राज्यात भाजप (BJP) सरकार सत्तेत येताच नवी मुंबई ‘अदानी’ला आंदण देण्याची तयारी सूरु झाली आहे. ‘अदानी’ समूह (Adani Group) आता मुंबई (भांडूप, मुलूंड), ठाणे (ठाणे, नवी मुंबई) आणि रायगड (खारघर, तळोजा, पनवेल, उरण) या परिसरातील वीज वितरण हक्क ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे.
अपेक्षेप्रमाणे, सार्वजनिक आक्षेपांना न जुमानता वीज नियामक आयोग (एमईआरसी) लवकरच ‘अदानी’चा अर्ज मंजूर करण्याची दाट शक्यता आहे. सध्या या परिसरात महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या महावितरण कंपनीकडून वीज मिळत आहे. ‘अदानी’ने यासंदर्भात शनिवारीच (ता.२६) एक जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे.
कंपनी मुलूंड, भांडूप, ठाणे जिल्ह्याचा काही भाग, नवी मुंबईचा समावेश असलेल्या प्रस्तावित परवाना क्षेत्रात वितरण नेटवर्क विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबई, पनवेल, खारघर, तळोजा आणि उरण या प्रस्तावित क्षेत्रासाठी कंपनीने वितरण परवाना मागितला आहे. सध्या हा परिसर महाराष्ट्र राज्य वीज वितरण क्षेत्रात येतो. वितरण परवाना मिळाल्यानंतर प्रस्तावित परवाना क्षेत्रामध्ये वीज पुरवठा विश्वसनीयरित्या पुरवण्यास सक्षम आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
प्रस्तावित क्षेत्रांमध्ये काही नगरपरिषद किंवा महानगरपालिका जसे की बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, सिडको, पनवेल महापालिका, उरण नगरपरिषद, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे क्षेत्र पूर्ण किंवा अंशतः समाविष्ट आहे. परवाना मिळाल्यापासून 5 वर्षांच्या आत 5 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्याचे कंपनीचे उद्धिष्ट आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबई लिमिटेडने (AENML) महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (MERC) हा अर्ज (केस क्रमांक 173 2022) सादर केला आहे. वीज कायदा, 2003 (“अधिनियम”) च्या कलम 14 च्या 6 व्या तरतुदीनुसार एमईआरसी (वितरण परवान्याच्या सामान्य अटी) विनियम, 2006 च्या तरतुदींसह ‘अदानी’ ला वितरण परवाना मंजूर करण्यासाठीचा हा अर्ज आहे.
आयोगाने 25 नोव्हेंबर 2022 रोजी हा अर्ज स्वीकारला आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) या तिच्या उपकंपन्यांद्वारे वांद्रे ते पश्चिमेकडील मीरा-भाईंदर आणि पूर्वेकडील सायन ते मानखुर्द या मुंबई उपनगरी भागात आणि आसपासच्या ग्राहकांना वीजेचा पुरवठा करत आहे. कंपनीचे सध्या ३१ लाख वीज ग्राहक आहेत. कंपनी 2,000 मेगावॅट विजेची मागणी पूर्ण करत आहे.
‘दैनिक महाराष्ट्र ‘चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!