जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण होते
जळगावमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्यातील वाद आता विकोपाला जात आहे. मागच्या काही दिवसांपासून गिरीष महाजन आणि एकनाथ खडसे एकमेकांवर जोरदार प्रहार करताना दिसून येत आहे. त्यात आज ( २१ नोव्हेंबर ) औषधांशाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करण्यावरून गिरीष महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात खडाजंगी झाली आहे.
जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक आज ( २१ नोव्हेंबर ) पार पडली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे हे बैठकीला उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी औषधांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी खर्च करण्याबद्दल प्रश्न मांडला. यावर एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला.
जिल्हा नियोजन समितीतून औषधांसाठी निधी खर्च करण्याची गरज काय? वैद्यकीय शिक्षण विभागामधून निधी का वापरला जात नाही? करोनातील खर्च आता द्यायचा आहे का? असे प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले. यावरून गिरीश महाजन आणि खडसे यांच्यात वाद रंगला. त्यावर “तुमच्या घरातून पैसे जातात का?” असे प्रत्युत्तर गिरीश महाजन खडसेंना दिलं.
अखेर याप्रकरणात गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करत चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल, असे म्हटलं. दरम्यान, खडसे आणि महाजन यांच्यातील वादामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिलं आहे.