‘ब्रेकअप’ झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घरातच मित्रांच्या मदतीने चोरी केल्याची घटना अंधेरी पश्चिम येथे उघडकीस आली. ओशिवरा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून प्रियकरासह तिघांना अटक केली आहे. प्रेयसीला आर्थिकदृष्ट्या कमजोर करायचे होते, त्यासाठी तिच्या घरात चोरी केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या प्रियकराने पोलिसांना दिली आहे.
ओशिवरा येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणीच्या घरी गुरुवारी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली, अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून दागदागिने, रोख रक्कम असा सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास केला होता. या तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक बाबी तसेच सीसीटीव्ही फुटेज मदतीने पोलिसांनी या चोरट्याचा शोध घेऊन तिघांना २४ तासांत अटक केली.
अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक जण तक्रारदार तरुणीचा मित्र असल्याचे समोर आले. या तरुणीचे अटक आरोपीपैकी एका सोबत मागील काही वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते, मागील काही आठवड्यापूर्वी काही कारणास्तव दोघात वाद होऊन दोघांममध्ये ब्रेकअप झाले होते. प्रेयसीने आपल्यावर अवलंबून राहावे यासाठी त्याने तीला आर्थिक दृष्ट्या दुर्बळ कसे करता येईल याचा विचार करीत असताना, प्रेयसीच्या घरात चोरी करून तीला पूर्णपणे कंगाल करण्याची योजना त्याने आखली आणि दोन मित्रांच्या मदतीने त्याने प्रेयसीच्या घरात चोरी केली अशी धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली अशी माहिती पोलिसांनी दिली.