दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने अहवाल सादर केला. यात तिचा मृत्यू अपघाती झाल्याचे स्पष्ट केले. दारूच्या नशेत तिचा तोल गेल्याने 14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याचे सीबीआयने सांगितले आणि तपासही बंद केला. त्यामुळे राणेंच्या आरोपांवर सीबीआयचा एकप्रकारे काऊंटर अॅटॅकच आहे. या अहवालानंतर आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एक ट्विट करीत प्रतिक्रिया दिली आहे.
दिशाचा मृत्यू (दि. 8 जून 2020)

सुशांत सिंग राजपूर, ऐश्वर्या राय बच्चन यांसारख्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींसाठी मॅनजर म्हणून काम पाहणाऱ्या दिशा सालियान हिचा मालाड येथील इमारतीवरून पडल्याने मृत्यू झाला. सुरुवातीला तिने आत्महत्या केली असे म्हटले गेले होते. दिशाला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
काही दिवसांतच सुशांतची आत्महत्या (दि. 14 जून 2020)
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरी आत्महत्या केली. वांद्र्यातल्या राहत्या घरी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. निराशेतून त्याने आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी त्याची मॅनेजर दिशा सालियान हिचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते.
प्रकरणाला राजकीय वळण
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात राजकीय वाद रंगला होता. या प्रकरणात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले होते. आदित्य ठाकरेंवर हे आरोप करण्यात आले होते. यावरुन राजकारणही केले जात होते.
राणेंचे ठाकरेंवर आरोप
- नारायण राणेंनी दिशा सालियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानचा खून झाला. तिच्यावर अत्याचार करून खून झाला. त्या प्रकरणातील आरोपींना का अटक झाली नाही. कोण मंत्री होता? का वाचवण्यात आलं?
- सचिन वाझेला पोलिस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवले असे आरोप नारायण राणेंनी केले होते.
आदित्य ठाकरेंवर झाले गंभीर आरोप
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंवर केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते. दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप राणेंनी केले होते. आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणात होते व सचिन वाझेने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप करुन अशी पाप करायला मुख्यमंत्री झाला होता का? अशी गंभीर टीकाही तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांच्याकडून झाली होती. आत्महत्या नाही तर ती हत्या आहे, माझ्याकडे पुरावे आहेत. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हही नितेश राणे यांनी व्यक्त केले होते.
बिहार पोलिसांची एंट्री
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात या अभिनेत्याचे वडील केके सिंग यांनी पाटण्यात रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी तपासासाटी बिहार पोलिस मुंबईत आली. तसेच सुशांतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या घरीही बिहार पोलिसांनी विचारपूस केली. सुशांतच्या मृत्यूच्या 6 दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाल्यामुळेच बिहार पोलिस विचारपूस करण्यासाठी दिशाच्या घरी गेली होती. तसेच बिहार पोलिसांनी मालाड मालवणीच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येही घटनास्थळी जाऊन पाहणी तसेच चौकशी केली होती.

दिशाच्या आईवडिलांची राणेंविरुद्ध तक्रार
राणेंनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आरोप केले होते. त्यानंतर दिशाच्या आई वडीलांनीही माध्यमांशी संवाद साधत या आरोपात तथ्थ नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर त्यांनी राणेंविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
राणेंवर झाला होता गुन्हा दाखल
दिशा सालियान प्रकरणी नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषद घेत तिचा बलात्कार करून खून झाल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर दिशा सालियानच्या आई-वडिलांनी राणेंविरोधात तक्रार दाखल केली होती. यात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात मालवण पोलिसांनी नितेश राणे आणि नारायण राणे यांना समन्सही बजावले होते.
सीबीआयने प्रकरण घेतले हातात
दिशा सालियान प्रकरणात आरोप – प्रत्यारोप झाल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. याप्रकरणात दिशाशी संबंधित प्रत्येक बाबीची चौकशी सीबीआयने केली. या प्रकरणात सखोल तपास करून त्यांनी एक अहवालही तयार केला.

सीबीआयचा अहवाल, दिशाचा मृत्यू अपघातीच!
विधानसभेतही नितेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणात मुद्दा मांडला होता. राज्याचा एक मंत्री दिशा सॅलीयनच्या हत्येत आणि बलात्कारात सहभागी होते. त्यातील प्रत्यक्षदर्शीही होता. याबाबतच्या पुराव्याचा पेनड्राईव्ह मी न्यायालयामार्फत देईल. आम्ही सिद्ध करू शकतो की, महाराष्ट्रातील एक मंत्री या प्रकरणात होता. असा दावाही नितेश राणे यांनी केला होता. मात्र, सीबीआयने अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत.
नितेश राणेंचे आजचे ट्विट

“मी सीबीआयने नोंदवलेल्या निरीक्षणासाठी त्यांना दोष देणार नाही. 72 दिवसांनी सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला होता. 8 जूनपासून महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने इतक्या चांगल्या पद्धतीने सर्व पुरावे मिटवण्यात आले की, सीबीआयकडे तपास आला तेव्हा काहीच सापडलं नाही,” असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. Master of all Cover ups! असंही ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.