मुंबई : वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात १ जून २०२२ रोजी इलेक्ट्रिक बस दाखल झालेली आहे. ‘शिवाई’ असे या बसचे नाव असून या वर्षाअखेरीस २ हजार पर्यावरणपूरक गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्यात एसटी महामंडळात सप्टेंबरअखेर १०० विद्युत बस दाखल होतील.
विद्युत बसगाड्या
एसटी महामंडळाचा आर्थिक तोटा, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना प्रदूषणमुक्त प्रवास करता यावा यासाठी विजेवर धावणाऱ्या गाड्यांचा समावेश प्रवासी वाहतुकीत करण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ३० ते ३५ गाड्यांचा ताफा महामंडळात दाखल होईल. सप्टेंबरमध्ये टप्याटप्याने या गाड्या महामंडळाकडे सुपूर्द करण्यात येतील. या गाड्यांसाठी मुंबई सेंट्रल येथे चार्जिंग स्टेशन उभारले जाईल अशी माहिती एमइआयएल समूह कंपनीच्या इवेट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी दिली.
अश्वमेध आणि शिवनेरी या व्यावसायिकाच्या गाड्या महामंडळात भाडेतत्वावर आहेत. लवकरच हा करार संपणार असून या कराराचे नूतनीकरण करण्यात येणार नाही. महामंडळात ऑलेक्ट्रा कंपनीच्या विद्युत बसगाड्या दाखल होणार आहेत, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
मुंबई – पुणे प्रवासासाठी इलेक्ट्रिक बस
मुंबई – पुणे प्रवासासाठी सुद्धा या इलेक्ट्रिक बसचा वापर केला जाणार आहे. मुंबई, ठाण्यातून पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेटसाठी येत्या ऑक्टोबरपासून टप्प्याटप्याने शिवाई बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. दादर – पुणे रेल्वे स्थानक व्हाया चिंचवड, परेल – स्वारगेट, ठाणे – स्वारगेट, बोरिवली – स्वारगेट असे मार्ग निश्चित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शिवाई बसमार्ग
दादर ते पुणे रेल्वे स्थानक व्हाया चिंचवड – २४ बस.
परळ ते स्वारगेट – २४ बस.
ठाणे ते स्वारगेट – २४ बस.
बोरिवली ते स्वारगेट – २४ बस.