बालक दिनाचे औचित्य साधून यशस्विनी, ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सातव्या शालेय सुपर लीग कबड्डी अनुषंगाने शालेय मुलांच्या प्रशिक्षणासह सराव तयारीस प्रारंभ करण्यात आला आहे. घाटकोपर-पश्चिम येथील माणिक लाल मैदानात यंग स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने ६१ शालेय मुलांचा वॉर्म-अप व सराव, माजी कबड्डीपटू-मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली संपन्न झाला. शालेय सुपर लीग कबड्डीचे २३ डिसेंबरपासून मुंबईमध्ये चार विभागवार शालेय स्पर्धा होणार असून प्रत्येक विभागातील विजेते संघ चम्पियन ऑफ चम्पियनसाठी सुपर लीगच्या लढती १० जानेवारीपासून देतील.
यशस्विनी योजनेअंतर्गत झालेल्या शालेय मुलामुलींच्या कबड्डी सराव शिबिरात पुणे विद्या भवन शाळेचा १० वर्षीय खेळाडू श्री अहिरेला सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार देऊन क्रीडापटू ओमकार मालडीकर, कबड्डी मार्गदर्शक सुनील खोपकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. उदयोन्मुख खेळाडू आशिष मिश्रा, सार्थक सरोदे, संध्या हाके, वैधवी सिन्हा, साक्षी सादर, प्रिया आयरे, सिद्धी भानुशाली, शरयू शेलार, स्वरूप वायदंडे यांनी उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार मिळविला.
यंदा शालेय सुपर लीग कबड्डीचे सातवे विजेतेपद पटकाविण्यासाठी माणिक लाल मुंबई पब्लिक स्कूल, सरस्वती विद्या मंदिर, अभ्युदय विद्या मंदिर, श्री हशू अडवाणी स्कूल, आरएसटी स्कूल, अँटोनिओ डिसोझा स्कूल, सेंट मेरी हायस्कूल, सेंट जोसेफ स्कूल, ताराबाई मोडक हायस्कूल, मुक्तांगण हायस्कूल आदी शालेय संघ जोरदार तयारी करीत असून एनआयएस कबड्डी प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, सुनील खोपकर, अविनाश महाडिक आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.