मुंबई : शेवटच्या षटकापर्यंत विजयाचे पारडे दोलायमान झालेल्या सामन्यात कस्तुरबा हॉस्पिटलने बलाढ्य जेजे हॉस्पिटल संघाला २ विकेटने चकविले आणि ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेमधील साखळी ड गटात दोन गुण वसूल केले. विसाव्या षटकाला विजयासाठी १४ धावांचे अवघड आव्हान महेश संगरच्या नाबाद अर्धशतकामुळे कस्तुरबा हॉस्पिटलने लीलया पेलले. परिणामी सलामीवीर सुभाष शिवगणने (६३ धावा व ३ बळी) अष्टपैलू खेळ करूनही जेजे हॉस्पिटल संघाला पहिल्या पराभवास सामोरे जावे लागले. अर्धशतकवीर महेश संगर व सुभाष शिवगण यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन क्रिकेटपटू नरेश शिवतरकर, डॉ. परमेश्वर मुंडे, चंद्रकांत करंगुटकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
नवरोज- आझाद मैदानावर नाणेफेक जिंकून जेजे हॉस्पिटलने प्रथम फलंदाजी केली. ३ बाद २५ धावा असा जेजे हॉस्पिटलचा घसरता डाव सलामीवीर सुभाष शिवगण (६१ चेंडूत ६३ धावा, २ षटकार व १ चौकार) व कप्तान नरेश शिवतरकर (३१ चेंडूत ३० धावा, ३ चौकार) यांनी चौथ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी करून सावरला. कस्तुरबा हॉस्पिटलचे प्रमुख गोलंदाज कप्तान डॉ. परमेश्वर मुंडे (२२ धावांत २ बळी) व रोहन ख्रिस्तिअन (२० धावांत २ बळी) यांनी अचूक गोलंदाजी केल्यामुळे जेजे हॉस्पिटलचा डाव मर्यादित २० षटकात ६ बाद १२४ धावसंख्येवर स्थिरावला. अष्टपैलू सुभाष शिवगण ( २३ धावांत ३ बळी) व जगदीश वाघेला (१७ धावांत २ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी करून कस्तुरबा हॉस्पिटलला १९ व्या षटकापर्यंत ८ बाद १११ धावसंख्येवर रोखले होते. परंतु शेवटच्या षटकात धडाकेबाज फलंदाजी करून महेश संगरने (३६ चेंडूत नाबाद ५० धावा, ४ चौकार) नाबाद अर्धशतक झळकाविले आणि कस्तुरबा हॉस्पिटलचा विजयसुध्दा .: १९.४ षटकात ८ बाद १२६ धावसंख्या फटकावून नोंदविला.