टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडने भारताचा तब्बल १० गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयाने टीम इंडियाचे स्वप्न भंगले आहे.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (१० नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर उभारलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताचा तब्बल १० गडी राखून दारूण पराभव करत अंतिम फेरीत जागा निश्चित केली. यासह भारतीय संघाचे दुसऱ्यांदा टी२० विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले. जॉस बटलरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी भारताच्या गोलंदाजीवर प्रहार केला. त्यामुळेच भारताच्या हातून यावेळी सामना निसटला. अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी अर्धशतक झळकावली, त्याचबरोबर शतकी भागीदारी केली आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला. या दोघांनी आपली विकेट न देता भारतावर दमदार विजय साकारल्याचे पाहायला मिळाले. फलंदाजांनी उभारलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलर व ऍलेक्स हेल्स यांनी सुरुवात केली. बटलरने पहिल्या षटकात तीन चौकार ठोकत आपले इरादे जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्या बाजूने ऍलेक्स हेल्सने आक्रमण केले. दोघांनीदेखील भारतीय गोलंदाजांची पिसे काढत आपापली अर्धशतके पूर्ण केली. त्यांनी संयम व आक्रमण यांचा सुरेख मेळ साधत विजय इंग्लंडच्या बाजूने नेला. बटलरने नाबाद ८० तर हेल्सने ८६ धावा करत इंग्लंडला दहा गड्यांनी विजय मिळवून दिला.
भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते, पण त्यावेळी संघाचा डाव सावरला तो कोहलीने. कारण यावेळी फक्त संघाला डाव सावरला नाही तर त्याने विश्वविक्रमही रचला. कोहलीने आता टी२० क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीने हा विक्रम करत आपल्या नावाला एक वेगळे वलय निर्माण झाले आहे. या विश्वचषकात कोहली भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे आता कोहली या विश्वचषकात नेमक्या किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कोहली हा भारतासाठी मॅचविनर ठरत असल्याचे पाहायला मिळत होते. पण भारताला हा सामना गमवावा लागला. इंग्लंडने १० गडी राखून टीम इंडियाचा दारूण पराभव केला. भारतीय संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडला. अंतिम सामना हा पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात १३ नोव्हेंबरला मेलबर्न येथे रंगणार आहे.