मुंबई : हिरानंदानी हॉस्पिटलने नवी मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी-केडीए हॉस्पिटलचा ६ गडी राखून पराभव केला आणि ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेमधील साखळी क गटात लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली. सामनावीर प्रतिक अंभोरेच्या अष्टपैलू खेळामुळे हिरानंदानी हॉस्पिटल संघाची जिंकण्यासाठी वाटचाल सुलभ झाली. सिध्दांत नवलेने (३२ धावा) दमदार फलंदाजी करूनही केडीए हॉस्पिटल संघाला पराभवास सामोरे जावे लागले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित सामन्यामधील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्रतिक अंभोरे व सिध्दांत नवले यांना क्रिकेटपटू प्रदीप क्षीरसागर व चंद्रकांत करंगुटकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
नवरोज-आझाद मैदान खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करतांना केडीए-नवी मुंबई हॉस्पिटलचा डाव १६.५ षटकात ८३ धावसंख्येवर संपुष्टात आला. सिध्दांत नवले (२४ चेंडूत ३२ धावा, १ षटकार व ४ चौकार) व मिल्टन लोबो (२१ चेंडूत १९ धावा, २ चौकार) यांनी घसरता डाव सावरण्याचा प्रयत्न करूनही केडीए हॉस्पिटल संघाला धावांचे शतक गाठता आले नाही. प्रतिक अंभोरे (२४ धावांत २ बळी) व प्रशांत देसाई (७ धावांत २ बळी) यांनी अचूक गोलंदाजी केली. विजयासाठी ८४ धावांचे लक्ष्य आटोक्यात राहिल्यामुळे हिरानंदानी हॉस्पिटलच्या आघाडी फळीची फलंदाजी बहरली. सलामीवीर तुषार राणे (३० चेंडूत २९ धावा, ४ चौकार) व प्रतिक अंभोरे (२१ चेंडूत नाबाद २४ धावा, ३ चौकार) यांच्या दमदार फलंदाजीमुळे हिरानंदानी हॉस्पिटलने १२ व्या षटकाला चौकार ठोकून ४ बाद ८६ अशी विजयी धावसंख्या रचली. …