मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मेगा प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचा शुभारंभ एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार दिसणार आहे. शिवरायांच्या व्यक्तिरेखेतील अक्षयचा फर्स्ट लूकही यावेळी लाँच करण्यात आला.
या सिनेमातून बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विशाल निकम हे त्रिकूट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत प्रख्यात अभिनेते प्रवीण तरडे दिसणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून असलेल्या बेहलोल खानला सात शिलेदारांनी कशी झुंज दिली, यावर या चित्रपटाचं कथानक बेतलं आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमाला राज ठाकरे यांनी क्लॅप दिली. गंमत म्हणजे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यासमोरच राज यांनी क्लॅप देत मुख्यमंत्र्यांना हिरो बनवण्याचा प्रयत्न केला.
अक्षय कुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारावी, यासाठी राज ठाकरे यांनी आग्रह केल्याचं अक्षय कुमार यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यावेळी पुन्हा एकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर दिसले.
दरम्यान, मुळशी पॅटर्न सारख्या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला चेहरा, धर्मवीर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तरडे यांनी प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विशाल निकम, तसंच महेश मांजरेकर यांचे सुपुत्र सत्या मांजरेकर, तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणा दा फेम हार्दिक जोशी इतर मावळ्यांच्या भूमिकेत आहेत.
कोण साकारणार कुठली भूमिका?
जीवाजी पाटील – विराट मडके
दत्ताजी पागे – सत्या मांजरेकर
तुळजा जामकर – जय दुधाणे
मल्हारी लोखंडे – हार्दिक जोशी
सूर्याजी कडे- उत्कर्ष शिंदे
चंद्राजी कोठार – विशाल निकम
प्रतापराव गुजर – प्रवीण तरडे