ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये हिरानंदानी हॉस्पिटल व लीलावती हॉस्पिटलने दणदणीत विजय मिळवून साखळी दोन गुण वसूल केले. हिरानंदानी हॉस्पिटलने सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा ८ गडी राखून तर लीलावती हॉस्पिटलने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा १० गडी राखून पराभव केला. हिरानंदानी हॉस्पिटलच्या विजयाचा शिल्पकार शंकर पंडीधरला सामनावीर पुरस्काराने ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी व क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर यांनी गौरविले
सुशांत गुरव (११ चेंडूत २० धावा), डॉ. मनोज यादव (१४ चेंडूत १८ धावा), रोहित सोमार्डे (२१ चेंडूत १४ धावा) व डॉ. हर्षद जाधव (४ चेंडूत १० धावा) यांनी छान फलंदाजी करूनही सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा डाव १६.३ षटकात ७८ धावसंख्येवर संपुष्टात आला. त्याचे श्रेय हिरानंदानी हॉस्पिटलच्या निखील नाले (७ धावांत ३ बळी) व अमोल शिरसाट (१२ धावांत ४ बळी) यांच्या गोलंदाजीला ध्यावे लागेल. शंकर पंडीधरच्या (२६ चेंडूत नाबाद ३३ धावा) एक षटकार व ५ चौकारांच्या फटकेबाजीमुळे हिरानंदानी हॉस्पिटलने विजयी लक्ष्य ९.४ षटकात २ बाद ७७ धावा फटकावून सहज साध्य केले.
सामनावीर रुपेश कोंडाळकर (५३ चेंडूत नाबाद ८८ धावा) व मनोहर पाटेकर (३४ चेंडूत नाबाद ३० धावा) यांच्या अभेद्य सलामी भागीदारीमुळे लीलावती हॉस्पिटलने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरूद्ध १५३ धावांचे आव्हान सहज पार केले. सलामीवीर प्रदीप क्षीरसागर (३१ चेंडूत ३३ धावा), प्रफुल मारू (२५ चेंडूत नाबाद २८ धावा), सुदेश यादव (१३ चेंडूत नाबाद २२ धावा), शंतनू मोरे (२३ चेंडूत २० धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने मर्यादित २० षटकामध्ये ७ बाद १५२ धावांची मजल गाठली होती.