अंधेरीच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी-केडीए हॉस्पिटलने सामनावीर प्रतिक घरतच्या (४४ धावा व २ बळी) अष्टपैलू खेळामुळे सायन हॉस्पिटलचा ९० धावांनी पराभव केला आणि आयडियल ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेची सलामी लढत जिंकली. नवरोज क्लबच्या सेक्रेटरी श्रीमती राधिका राउळ व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावर उद्घाटनप्रसंगी देण्यात आलेला नाणेफेकीचा कौल केडीए हॉस्पिटलने जिंकला.
प्रतिक घरत (२४ चेंडूत ४४ धावा, १ षटकार व ५ चौकार) व प्रतिक शाह (२४ चेंडूत २१ धावा, २ चौकार) यांच्या दमदार फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ९ बाद १५१ धावांची आतषबाजी केली. सुरेंद्र भोईर (३३ धावांत ३ बळी) व निलेश चव्हाण (२१ धावांत २ बळी) यांनी महत्वाचे बळी मिळवूनही केडीए हॉस्पिटलची जलद धावगती सायन हॉस्पिटल संघाला रोखता आली नाही.
केडीए हॉस्पिटलचे प्रमुख गोलंदाज हितेश विघावे (५ धावांत २ बळी), प्रतिक घरत (८ धावांत २ बळी) व देवेंद्र भानसे (१७ धावांत २ बळी) यांनी प्रारंभापासून अचूक मारा केल्यामुळे सायन हॉस्पिटल संघाचा डाव १५.४ षटकात ६१ धावांवर कोसळला. परिणामी केडीए संघाने अ गटातील पहिला साखळी सामना ९० धावांनी जिंकून २ गुण वसूल केले. सायन हॉस्पिटलच्या संदीप चौधरीने १५ चेंडूत १४ धावांची छान फलंदाजी केली. आकर्षक टी शर्ट दिल्याबद्दल ओम्नी कंपनीचे संचालक ओमकार मालडीकर यांचे सहभागी हॉस्पिटल संघांनी कौतुक केले.