मुंबई दि.३१:राष्ट्रीय मिल मजदूर संघाची अमृतमहोत्सवी वर्षा पर्यंतची शान वाढण्यास ज्या गिरणी कामगार प्रतिनिधींनी निष्ठा आणि समर्पित भावनेने योगदान दिले,त्यांचा सन्मान आज उचित ठरतो,असे गौरवोद्गार संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी येथे बोलताना काढले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन नुकताच संपन्न झाला. या औचित्याने संघटनेच्या लढ्यात सलग २५ वर्षे कार्यरत असलेल्या जवळपास ६८ प्रतिनिधीचा सन्मान करण्यात आला. उर्वरित ३४ प्रतिनिधींचा आज मनोहर फाळके सभागृहात दुसऱ्या सत्रात शाल,श्रीफळ आणि स्मृती चिन्हाने सन्मान करण्यात आला. समारंभाला ज्येष्ठ मराठी अभिनेते शिवाजी साटम प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले.सचिनभाऊ अहिर यांनी मागील वाटचालीतील आठवणीना उजाळा देताना म्हटले आहे, जागतिकी करणाच्या लाटेत अनेक गिरण्या बंद पडल्या. त्यातील कामगारांना त्यांची देणी मिळवून देण्यासाठी जो लढा उभा केला त्यात कामगारांचे योगदान विसरता येणार नाही.
अभिनेते शिवाजी साटम म्हणाले, कामगारांचा सन्मान करतांना आपलाच सन्मान होतोय हा अनुभव मला घेता आला आहे.माझ्या वडिलांसह माझे अनेक नातेवाईक गिरणी कामगार राहिल्याने गिरणी कामगारांची सर्वच सूख-दु:ख मला जवळून पाहता आली आहेत. गिरणी कामगार प्रतिनिधींचा सन्मान निश्चितच श्रमाची प्रतिष्ठा वाढविणारा आहे.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते आपल्या विस्तृत भाषणात म्हणाले, कामगारांच्या प्रश्नावरील लढे असतील किंवा अन्य सामाजिक कामे असतील त्यामागे गं.द.आंबेकरजींचा आदर्श महत्त्वाचा ठरला आहे.सर्वश्री खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष बजरंग चव्हाण,राजन लाड, मा.सुनिल अहिर, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे आदी पदिधिकारी त्या वेळी उपस्थित होते.शेवटी सन्मानित कामगारांच्या वतीने इ़दू नं.२ चे निवृत्त कामगार आनंदा खंडाळीत यांनी संघटनेचे आभार मानले.