संतोष सकपाळ (मुंबई मनपा सुत्रांकडून)
मुंबई : संपूर्ण मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत १० टक्के कपात केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पिसे जल शुद्धीकरण प्रकल्पाच्या दुरुस्तीमुळे ही कपात केली जाणार आहे. या कालावधीत ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱया पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणात मुबलक पाणीसाठा असला आणि पाणी कपातीची गरज नसली तरी पुढचे दहा दिवस मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. भिवंडीतील पिसे पांजरापूर येथे मोठे पालिकेचे मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवार १ ते १० नोव्हेंबरपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबईमधील व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱया पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. ठाणे, भिवंडी येथील महापालिकांना केल्या जाणार्या पाणी पुरवठ्यात देखील १० टक्के कपात केली जाणार आहे.