मुंबई, २८ ऑक्टोबर २०२२
“सत्य बोलण्याचा गुन्हा ज्यांनी केला ते मारले जातात. आपला देश असो की शेजारी देश सत्य बोलणाऱ्यांची हत्या होते. इराणमध्येही मुली स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. डॉक्टर दाभोलकर यांच्यासारखी आदर्श माणसं आहेत, जी आपल्याला प्रेरणा देतात. त्याची स्मृती मिटण्याऐवजी आणखी खोल आणि ठळक झाली आहे” असे सुप्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह म्हणाले. ‘फ्रेण्डस ऑफ दाभोलकर’ आयोजित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘कसोटी विवेकाची’ प्रदर्शनाचे उद्घाटन आज ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा याच्या हस्ते झालं. नरेंद्र दाभोलकरांचे जीवन विचार आणि कार्य यांचं जे जे कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती इथे सादर केल्या आहेत. यावेळी नसीरुद्दीन यांनी हरिशंकर परसाई यांची ‘भेड और भेडीये’ कहाणी वाचून दाखवली.
‘या प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांची कला अत्यंत कौतुकास्पद आहे. तरूण पिढीकडून मला कायमच प्रेरणा मिळत आली आहे. आमच्या पिढीपेक्षा ही तरूण पिढी अधिक आश्वासक आहे. अशा प्रकारच्या प्रदर्शनातून ते कलाकार म्हणून खूप मह्त्वाचे योगदान देत आहेत, ‘ शाह म्हणाले.
या कलाप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी दाभोलकर आणि पानसरे खूप खटल्यात निर्भयपणे लढणारे वकील अभय नेवगी उपस्थित होते. हा खटला लढवताना खूप अनपेक्षित वळणं आणि चढ-उतार आले. त्यामुळे मला माझ्या काही केसेस गमवावे लागल्या. तशीच मला न्यायालय आणि लोकांची साथही मिळाली आहे. कितीही वर्षं लागली तरी ही लढाई चालू राहील. मी थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘लढणं म्हणजेच जिंकणं आहे’ असं नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी डॉ शैला दाभोलकर म्हणाल्या. “हे प्रदर्शन पाहणारा त्यातून काही ना काही शिकेल, जमेल तेव्हढी कृती करत राहील” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विज्ञानवादी विचार आणि विवेकवादी जीवनशैली यांचा प्रसार करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी प्रात्यक्षिकं, भाषणं, लेखन, संघटन, आंदोलन, कायदेबदल इत्यादींच्या माध्यमातून चाळीसहून अधिक वर्षं अथक कार्य केलं. हे कार्य, संघर्ष, कसोटी विवेकाची कला प्रदर्शनात जे जे कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलं. त्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.