मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि आयडियल ग्रुपतर्फे १ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेमधील साखळी ब गटात माजी विजेते नानावटी हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल व ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल हे तिन्ही बलाढ्य संघ झुंजणार आहेत. दिवाळी क्रिकेट पहाट साजरी करतांना ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे संचालक ओमकार मालडीकर यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी अजिंक्य नाईक, जॉइंट सेक्रेटरी दीपक पाटील व सदस्य निलेश भोसले यांचा विशेष सत्कार केला.
साखळी अ गटात केडीए हॉस्पिटल-अंधेरी, सायन हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल; क गटात हिरानंदानी हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई तर ड गटात जसलोक हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल संघामध्ये विजेतेपदासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत नवरोज-आझाद मैदान येथे लढती होणार असल्याची माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी दिली. स्पर्धेमधील उदयोन्मुख रुग्णालयीन क्रिकेटपटूना मुंबईतील क्रिकेट तसेच इंग्लंड येथील कौंटी क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळविण्यासाठी संघटक ओमकार मालडीकर उत्सुक आहेत. रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा गाजविणारे अष्टपैलू क्रिकेटपटू लीलावती हॉस्पिटलचे धर्मेश स्वामी व कस्तुरबा हॉस्पिटलचे अंकुश जाधव तसेच डॉ. स्वप्नील निसाळ यांचा स्पर्धेवेळी गौरव करण्यात येणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना ओम्नी ट्रॉफीसह सर्व खेळाडूंना ओम्नी टी शर्टचे स्पर्धेमध्ये आकर्षण असेल.