मुंबई : ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर ओमकार मालडीकर यांनी दिवाळी पहाटदिनी जे.जे. हॉस्पिटल येथील संत गाडगे महाराज धर्मशाळेत कॅन्सर व इतर आजाराने पिडीत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना यशस्विनी अन्नदानाचा उपक्रम राबविला. क्रिकेट क्षेत्रात नावलौकिक असलेले क्रिकेटपटू ओमकार मालडीकर यांनी सामाजिक बांधीलकेचे कार्य सुरु केल्याबद्दल एमसीएचे जॉइंट सेक्रेटरी दीपक पाटील, नवरोज क्रिकेट क्लबचे शाम राउळ, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींनी कौतुक केले.
यशस्विनी अन्नदान व श्रमदान उपक्रमाचे औचित्य साधून संत गाडगे बाबा अन्नछत्राचे विश्वस्त एकनाथ ठाकूर यांच्या सेवाभावी कार्याचा ओमकार मालडीकर यांनी विशेष गौरव केला. रुग्णालयीन क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी गतवर्षापासून आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व ग्रुप माध्यमातून क्रीडा संघटक ओमकार मालडीकर यांचे आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेसाठी मोलाचे कार्य आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट स्पर्धेत मिडलसेक्स संघातून प्रतिनिधित्व केले असून क्रिकेटचा श्रीगणेशा शारदाश्रम शाळेतून गिरविला आहे. परिणामी मुंबईतील विविध वयोगटातील युवा क्रिकेट स्पर्धा, आयडियल आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा, आयडियल शालेय बुध्दिबळ स्पर्धा आदी उपक्रमात ओमकार मालडीकर यांचे असलेले महत्वपूर्ण योगदान आता मुंबईकरांना रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर आयोजनात देखील लवकरच दिसून येणार आहे.
******************************