Aurangabad News: सर्वसामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी स्वस्तात साजरी व्हावी म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) वाटपाची घोषणा केली. मात्र ‘आनंदाचा शिधा’ सुरवातीपासूनच वादात सापडल्याने चर्चेचा विषय बनला आहे. आधी ‘आनंदाचा शिधा’च्या पिशव्यांवर स्टिकर लावण्याचे काम सुरु असल्याने वाटपास उशीर झाल्याचा आरोप झाला. त्यातच आता ‘आनंदाचा शिधा’ पाकिटातून तेल गायब झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘आनंदाचा शिधा’च्या पिशव्यांतून तेल गायब होणे हा शिंदे सरकार चा महाघोटाळाच म्हणावे लागेल.
एबीपी माझा नुसार दिलेल्या बातमीत याबाबत वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. आज दिवाळीच्या दिवशी देखील औरंगाबाद जिल्ह्यात आनंदाचा शिधा वाटप केला जातोय. मात्र यामध्ये केवळ तीनच वस्तू दिल्या जात आहे. सद्या अनेक ठिकाणी रवा,साखर आणि चना डाळ या पाकिटातून दिल्या जात असून, गोड तेलाचा पुडा मात्र गायब आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण तालुक्यासह इतर ठिकाणी देखील तेल मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांना डाळ रवा आणि साखरच द्यावी लागते, यासाठी 75 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे आता नागरिकांना अंदाजे 125 रुपये पेक्षा अधिक पैसे देऊन बाजारातून तले विकत घ्यावे लागणार आहे. यामुळे नागरिकांना आनंदाची शिधा 200 रुपयांना पडत आहे.
नागरिकांना वाटपासाठी आलेल्या ‘आनंदाचा शिधा’च्या कीटमध्ये तीनच पदार्थ आले असून, तेल गायब आहे. त्यामुळे रेशन दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक तेलबाबत विचारत आहे. पण वरूनच तेल आले नसल्याचे प्रत्येक ग्राहकांना समजून सांगताना दुकानदारांची दमछाक होत आहे. तर अनेक ठिकाणी तुम्हीच तेल वाटप करत नसल्याचा आरोप रेशन दुकानदारांवर होत असल्याने, त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आधीच कोरोनामुळे दोन वर्षे दिवाळी साजरी करता आली नाही. त्यातच अजूनही अनेकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाल्याने ते देखील संकटात सापडले आहे. त्यामुळे अशात सरकारने घोषणा केलेल्या ‘आनंदाचा शिधा’ वाटपाच्या निर्णमुळे काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता सरकारची ‘आनंदाचा शिधा’ 100 एवेजी 200 रुपयांना पडत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.