IND vs PAK: बरच नाटय, 2 विकेट, सर्वांचच टेन्शन वाढवणारी ‘ती’ लास्ट ओव्हर कशी होती?
Virat-KohliImage Credit Source: PTI
T20 World Cup : टी२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज मेलबर्नमध्ये महामुकाबला झाला त्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी ४ धावा करून माघारी परतले. नसीम शाहने केएल राहुलची तर हारिस रौऊफने कर्णधार रोहित शर्माची शिकार केली.
रोहित – राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र १० चेंडूत १५ धावा केल्यानंतर हारिस रौऊफच्या वेगाने त्याला चकवले. भारतीय संघाने सूर्यकुमार बाद झाल्यानंतर डावखुऱ्या अक्षर पटेलला शादाब खान, नवाझविरूद्ध धावगती वाढवण्यासाठी बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवले. मात्र तो केवळ २ धावा करून बाद झाला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली याने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. त्याने या धावा करताना ४ षटकार आणि ६ चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या यानेही ४० धावांचे योगदान दिले. यामध्ये १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या तिघांशिवाय एकाही फलंदाजाला २ आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
टीम इंडियाने आज पाकिस्तानवर मेलबर्नच्या मैदानात थरारक विजय मिळवला. या विजयाचा नायक विराट कोहली आहे, त्याच्यामुळेच टीम इंडिया जिंकली. पण लास्ट ओव्हरमध्ये जे घडलं, ते खूपच रोमांचक होतं. क्रिकेट चाहत्यांना एक वेगळी अनुभूती या सामन्याने दिली. प्रत्येक चेंडूनंतर श्वास रोखले जात होते. अखेरच्या चेंडूपर्यंत कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे डोळे टीव्हीकडे लागले होते. सर्वांचच टेन्शन वाढवणारी ही लास्ट ओव्हर होती तरी कशी? जाणून घेऊया.
लास्ट ओव्हरमध्ये काय स्थिती होती?
टीम इंडियाला शेवटच्या षटकात विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. क्रीजवर हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीची जोडी होती. सर्वांचच लक्ष या दोघांकडे लागलं होतं. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाज गोलंदाजी करणार होता.
19.1: हार्दिक पंड्या मोहम्मद नवाजच्या चेंडूवर मिडविकेटला मोठा फटका खेळायला गेला. पण आऊट झाला. बाबर आजमकडे त्याने सोपा झेल दिला.
19.2: स्ट्राइकवर आलेल्या दिनेश कार्तिकने 1 रन्स घेतला.
19.3: विराट कोहलीने 2 धावा काढल्या.
19.4: विराटने या बॉलवर सिक्स मारला. पण हा चेंडू अंपायरने नो बॉल दिला. बाबर आजमने यावरुन पंचांशी हुज्जतही घातली. अंपायर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. नवाजने हा चेंडू कमरेच्या वर टाकला होता.
19.4: मोहम्मद नवाजने वाइड चेंडू टाकला. त्यामुळे फ्रि हिट कायम राहिला.
19.4: विराट कोहली फ्रि हिटच्या या चेंडूवर बोल्ड झाला. पण टीम इंडियाने पळून 3 रन्स काढले. पाकिस्तानी टीमने पुन्हा अंपायरशी वाद घातला. हा डेड बॉल द्यावा, अशी त्यांची इच्छा होती. पण भारताला 3 रन्स मिळाल्या.
19.5: भारताला विजयासाठी 2 चेंडूत 2 धावांची गरज होती. दिनेश कार्तिक स्ट्राइकवर होता. पण तो स्टम्पआऊट झाला.
19.6: आता भारताला 1 बॉलमध्ये 2 रन्स हव्या होत्या. पण नवाजन वाइड चेंडू टाकला.
19.6: आता भारताला 1 बॉलमध्ये 1 रन्स हवा होता. अश्विनने ही धाव घेऊन टीम इंडियाला विजय मिळवून दिला.