रेशिमबाग येथील मैदानात आयोजित कार्यक्रमाला ख्यातनाम गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. “परमवैभवी भारत होगा’ हे सांघिक गीत, शारीरिक कवायती आणि प्रात्यक्षिकानंतर कार्यक्रमाला सुरूवात झाली. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर प्रथमच विजयादशमी उत्सव मोकळ्या वातावरणात झाल्यामुळे स्वयंसेवकांत उत्साह होता.

आम्हाला एकत्र राहायचे असेल तर तर आम्हाला भारताचे व्हावे लागेल. आम्ही भारतीय पूर्वजांचे आणि भारतीय संस्कृतीचे वंशज आहोत. आमचे पंथ, संप्रदाय भलेही वेगळे असतील. भाषा, प्रांत, खाण्यापिण्याच्या पद्धती भलेही वेगवेगळ्या असू दे. पण समाज आणि राष्ट्रीयतेच्या संबंधाने आम्ही एक आहोत. हाच आमच्यासाठी तारक मंत्र आहे. असे भागवत म्हणाले.
हे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. योगी अरविंदा यांचा जन्म 15 ऑगस्टचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी एक संदेश दिला. त्यात त्यांनी त्यांची पाच स्वप्ने सांगितली आहे. स्वतंत्र, एकात्म, अखंड भारत हे पहिले स्वप्न सांगितले. स्वातंत्र मिळाले आणि संविधानामुळे सारे संस्था मिळून एक देश झाला. परंतु त्या नंतरही पाकिस्तानची निर्मिती झाली. यामुळे हिंदु मुस्लिमांमधील दरी कमी होण्याऐवजी एक शाश्वत राजकीय दरी निर्माण झाली. हे चुकीचे झाले.
आम्ही हिंदु संघटन करतो. पण आम्ही कोणाचा विरोध करीत नाही. लोक भारतीय, इंडिक असा शब्दप्रयोग करतात. पण आम्ही आमच्या स्पष्टतेसाठी हिंदु शब्दाचा उपयोग करू. साधन, शूचिता आणि तपस्येच्या आधारावर संघाचे संघटन निर्माण झाले आहे. त्यामुळे संघ शक्ती उपद्रवी कधीच होऊ शकत नाही. आम्हाला कोणी जिंकू शकू नये अशी आमची प्रार्थना आहे. कारण जगाला जिंकायचे आहे. आत्मरक्षा केवळ अधिकार नाही तर ते कर्तव्य आहे. जगाला एक करण्याची ईच्छा आहे.

वाढती लोकसंख्या ओझे आहे असे मानून चालणार नाही. केवळ वाढती लोकसंख्या हेच कारण नाही. शेजारी चिनने लोकसंख्या नियंत्रणाचे धाेरण कठोरतेने राबवले. परिणामी तिथे काम करायलाही तरूण राहिले नाही. शेवटी त्यांना दोन अपत्यांना प्रोत्साहन द्यावे लागले. त्यामुळे लोकसंख्येचे संतुलन असणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येचा प्रगतीसाठी उपयोग केला जाऊ शकतो असे सरसंघचालक म्हणाले.
लोकसंख्येचे संतुलन हवे
लोकसंख्येत प्रमाणाचे संतुलन पाहिजे. लोकसंख्येचे असंतुलन झाले तेव्हा 50 वर्षांपूर्वी त्याचे गंभीर परिणाम झाले. पंथ, संप्रदायाच्या लोकसंख्येत खूप फरक झाल्याने नवीन देशाची निर्मिती झाली. लोकसंख्येचे धोरण सर्वांना समान लागू झाले पाहिजे. 50 वर्षांनंतर आम्ही किती लोकांना जेवू घालू शकतो, त्यांची जबाबदारी घेऊ शकतो याचा समग्र विचार करून धोरण तयार करावे लागते.
करिअरसाठी इंग्रजी आवश्यक नाही
करिअरसाठी इंग्रजी आवश्यक आहे अशी एक ठाम समजूत आहे. पण करिअरसाठी इंग्रजी आवश्यक नाही. आम्ही मातृभाषेच्या गोष्टी खूप करतो. पण स्वत:पासून कोणत्याही गोष्टीची सुरूवात करीत नाही तोपर्यंत काहीही साध्य होत नाही. आम्ही मातृभाषेच्या गोष्टी करतो. पण, आमच्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो. घरावरील नेमप्लेट, मंगल कार्यालयाच्या निमंत्रण पत्रिका आम्ही इंग्रजीतून पाठवतो. शैक्षणिक धोरणांत मातृभाषेतून शिक्षण देण्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्याचा अभ्यासक्रमही तयार होत आहे. पण समाजाचे सहकार्य मिळत नाही तोपर्यत कोणतीही गोष्ट यशस्वी होत नाही, याकडे सरसंघचालकांनी सांगितले.

भारताची प्रतिष्ठा, विश्वासार्हता जगात वाढली. लंकेला आम्ही मदत केली, रशिया युक्रेन युद्ध प्रसंगात भारताच्या भूमिकेचे स्वागत झाले. राष्ट्रीय सुरक्षेत आम्ही स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होत आहोत. अर्थ व्यवस्था रूळावर येत असून प्रगती करील असे जगाचे म्हणने आहे. नवनिर्मितीची चाहुल ऐकून आनंद होतो. आत्मनिर्भरतेची भावना शासन, प्रशासन, कार्यकर्त्यांत सारखी असली पाहिजे.
संघाच्या कार्यक्रमात यापूर्वी राजकुमारी अमृत कौर, अनसूयाबाई काळे, कुमुद रांगणेकर सहभागी झालेल्या आहे. पुरूष आणि स्री असा भेद आम्ही करीत नाही. आम्ही महिलांच्या कर्तुत्वाला मर्यादा घातल्या. आता त्यांना त्यातून मुक्त करण्याची गरज आहे असे सरसंघचालकांनी सांगितले. दोघांशिवाय समाज वा सृष्टीची निर्मिती होत नाही. समाजाच्या इतर सर्व ठिकाणी पुरूष व महिला मिळून काम करतात. महिलांना एक तर जगजनीनी मानून घरात बंद करतो वा पूजा करून मखरात बसवतो. सार्वजनिक वा कौटुंबिक कार्यक्रमात बरोबरीचे मानून त्यांना सक्रिय आणि सक्षम करणे आवश्यक आहे. महिलांना काम करण्याचे स्वातंत्र्य देऊन बरोबरीने वागवणे कालसुसंगत ठरले. त्यांच्या सहभागाशिवाय समाजाची पूर्ण शक्ती कार्यरत होणार नाही, असे भागवत म्हणाले.

दहशतवादा विरोधात समाजाने एकजूटीने उभे राहावे
श्री गुरूजींना डॉ. जिलानी भेटले तेव्हापासून अल्पसंख्यांक समाजाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संवाद सुरू आहे. तेव्हापासून समन्वय आणि संवाद हळूहळू वाढत आहे. आणि ते वाढावे ही संघाची ईच्छा असून संघ हा संवाद कायम ठेवेल. कारण समाज तोडण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. अमरावती तसेच उदयपूरच्या घटनांनी समाजात दुही निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. पण, त्याचा संपूर्ण समाजाने विरोध केला. नेहमी होत नाही. पण, यावेळी मुस्लिमांमधील काही प्रमुखांनी या घटनांचा निषेध केला. केला. अन्याय, असत्य, अत्याचार व दहशतवादा विरोधात संपूर्ण समाजाने असेच एकजूटीने उभे राहिले पाहिजे. हा अपवाद ठरू नये अशी अपेक्षा सरसंघचालकांनी व्यक्त केली. मुखरता समाजाचा स्वभाव झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
संघाला पहिले समजून घ्या : यादव
यावेळी बोलताना पद्मश्री संतोष यादव यांनी जगभरातील नागरिकांनी नागपुरात येऊन संघाचे काम पाहावे असे सांगितले. संघ प्रचारक समर्पण आणि सेवाभावाने मानव कल्याणासाठी झटत राहातो असे त्या म्हणाल्या. माझे आचरण आणि व्यवहार पाहून लोक तुम्ही संघाच्या आहात काय असे विचारायचे. त्यावेळी संघ काय हेही मला माहिती नव्हते. अनेकदा एखादी गोष्ट जाणून न घेता, त्याविषयी माहिती करून न घेता लोक गैरसमजातून विरूद्ध बोलतात. संघाबाबतही असेच होते. तसे न करता पहिले समजून घ्या असे आवाहन संतोष यादव यांनी केले. स्वयंसेवकांसह प्रत्येकाने पहिले निरोगी राहू याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

काळाच्या गरजेनुसार बदल आवश्यक
कोरोनाच्या संकटातून बाहेर आल्यानंतर आपली अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे. पुढील काळात अर्थव्यवस्थेत तेजी कायम राहणार असल्याचे मत जगभरातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. देशातील क्रीडा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. आपल्या देशातील खेळाडूंचा आपल्याला अभिमान आहे. आपल्याला प्रगती करायची असेल तर आधी स्वत:ला ओळखावे लागेल. काळाजी गरज ओळखून आपण स्वत:मध्ये केला नाही तर आपल्या प्रगतीमध्ये तो मोठा अडथळा ठरेल.