न्युजहिंदइंडिया ब्रेकिंग
(संतोष सकपाळ)
- कार्यकर्ते रस्त्यावर भिडतायेत, एकमेकांची डोकी फोडतायेत
- शिंदे-ठाकरे गटातील नेत्यांचा एका विमानातून हास्यविनोद करत प्रवास!
शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठं बंड झालेलं असताना पक्षात मोठी पडझड झालीये. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा सांगितल्याने उद्धव ठाकरे यांच्यापुढे शिवसेना वाचविण्याचं मोठं आव्हान निर्माण निर्माण झालंय. ठाकरेंच्या प्रत्येक कृतीला एकनाथ शिंदे उत्तर देतायत. अगदी शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याचाही हक्क शिंदे गटाने ओढून घेतला. शिवेसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे होतायेत. आपल्याकडेच कशी जास्त गर्दी होईल, याचा प्रयत्न दोन्ही गट करतायेत. कालपासून राज्यभरातून दोन्ही गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत.
मुंबई : गेली तीन महिने दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांची जिरवण्याची भाषा करतायेत, कुणी कुणाला कायमचा धडा शिकविण्याचा चंग बांधलाय तर कुणी प्रतिस्पर्ध्यांना कायमचं राजकारणातून संपविण्याचा विडा उचललाय. दोन्ही गटात कमालीचा संघर्ष सुरु आहे. पण आज एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. कार्यकर्ते रस्त्यावर एकमेकांना भिडतायेत आणि नेते एका विमानातून हास्यविनोद करत प्रवास करतायेत. शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दसरा मेळाव्यासाठी औरंगाबादवरुन विमानाने मुंबईकडे रवाना झाले आहेत. तत्पूर्वी उड्डानाआधी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यामध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी गटाचे नेते हास्यविनोदात दंग आहेत.
शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठं बंड झालेलं असताना पक्षात मोठी पडझड झालीये. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा सांगितल्याने उद्धव ठाकरे यांच्यापुढे शिवसेना वाचविण्याचं मोठं आव्हान निर्माण निर्माण झालंय. ठाकरेंच्या प्रत्येक कृतीला एकनाथ शिंदे उत्तर देतायत. अगदी शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याचाही हक्क शिंदे गटाने ओढून घेतला. शिवेसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे होतायेत. आपल्याकडेच कशी जास्त गर्दी होईल, याचा प्रयत्न दोन्ही गट करतायेत. कालपासून राज्यभरातून दोन्ही गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आतापर्यंत दोन्गी गटाचे सुमारे लाखभर कार्यकर्ते मुंबईत दाखल झाल्याचा अंदाज आहे.
औरंगाबादेतील दोन्ही गटांच्या नेत्यांनी मुंबईला दसरा मेळाव्याला जाण्यासाठी एकाच विमानातून प्रवास केला आहे. शिंदे गटातील मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि ठाकरे गटातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुंबईला जाण्यासाठी औरंगाबाद-मुंबई विमानातून एकत्र प्रवास केला. विमानातील या प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. कार्यकर्ते एकमेकांना गद्दार-खुद्दाराची उपमा देतायेत, निष्ठेची उदाहरणे सांगतायेत, अन्यायाचा पाढा वाचतायेत. दुसरीकडे नेते मात्र पाठीमागील ३ महिन्यांचा सगळा संघर्ष विसरुन एकमेकांना टाळ्या देत हास्यविनोदात रंगलेले पाहायला मिळत आहेत.
शिवसेनेत ‘पडलेली फूट आणि शिवसेना नेमकी कुणाची? यावरून सुरू असलेला न्यायालयीन संघर्ष सुरू झाल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याबाबतच्या वादात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने लढाई जिंकली. ठाकरे यांना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचा बीकेसीच्या विशाल मैदानावर दसरा मेळावा पार पडतो आहे. शिंदे गटाने सर्व शक्तीनिशी मेळाव्याची तयारी केली आहे. जवळपास १८०० लालपरी आणि साडे तीन हजारांपेक्षा जास्त खासगी गाड्या शिंदे गटाने आरक्षित केल्या आहेत. दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईत जवळपास लाखभर शिवसैनिक दाखल झाल्याचा अंदाज आहे.