रिले रॉसोच्या झंझावाताने भारतीयाची गोलंदाजांनी लोटांगण घातले अन् टिम इंडियाचा पराभव झाला
IND vs SA: इंदोर येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील तिसरा टी२० सामना पार पडला. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील हा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेने ४९ धावांनी जिंकला. पहिल्या दोन सामन्यात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाहुण्या संघाने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात भारतीय संघ आजचा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल असे वाटत असताना मात्र भारताने शेवटचा सामना गमावला. मोहम्मद सिराजला बाद करत दक्षिण आफ्रिकेने भारतावर ४९ धावांनी विजय मिळवला. टी२० विश्वचषकापूर्वी हा टीम इंडियाचा शेवटचा सामना होता. रिले रॉसोला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला तर सुर्यकुमार यादव हा मालिकावीराचा मानकरी ठरला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या पॉवर प्ले नंतर दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. कर्णधार टेम्बा बावुमाला उमेश यादवने बाद केले. क्विंटन डी कॉकची शानदार फलंदाजी सुरु असताना त्याला दुसऱ्यांदा जीवदान मिळाले. सिराजने त्याचा झेल सोडला. रिले रॉसो आणि डी कॉक यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. त्याने ३३ चेंडूत ५३ धावा करत स्वतःचे ही अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला दुसरा मोठा धक्का बसला. क्विंटन डी कॉक ४३ चेंडूत ६८ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरने त्याला धावबाद केले. शेवटच्या सामन्यात रिले रॉसोने शानदार शतक पूर्ण करत ४८ चेंडूत १०० धावा केल्या. यामध्ये ७ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या शतकीखेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकने २०० धावांचा टप्पा पार करत भारतासमोर विजयासाठी २२८ धावांचे आव्हान ठेवले आहे. या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक याने ४३ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. दुसरीकडे, ट्रिस्टन स्टब्स (२३धावा) आणि डेव्हिड मिलर (१९ धावा) यांनीही खारीचा वाटा उचलला.
भारतीय संघाची धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्मा भोपळाही न फोडता तंबूत परतला. विराटच्या जागी श्रेयस अय्यरला स्थान मिळाले होते पण त्याचा फायदा मात्र त्याला उठवता आला नाही. एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेल्याने भारतीय संघाला मोठी भागीदारी करता आली नाही. सगळेच फलंदाज हे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर एकही फलंदाज टिकू शकला नाही.
आफ्रिकन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीच्या पार चिंधड्या उडवल्या. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित संघात सामील झालेला मोहम्मद सिराज फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. तो देखील खूप महागात पडला. त्यामुळे रोहित शर्मा समोर ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारात भारतीय संघ कमी पडला.
आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे खेळला जाणार आहे.