इस्त्रोची मंगळयान मोहिम संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे. आठ वर्षानंतर भारताचा मंगळयानाशी संपर्क तुटला आहे. यासोबतच आठ वर्षे चालणारे मार्स ऑर्बिटर मिशन संपले. मंगळयानाचे इंधन संपले आणि बॅटरीही डाऊन झाली यानंतर मंगळयानाचा संपर्क तुटला. इस्त्रोकडून मंगळयान मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली. सुरुवातीला केवळ सहा महिन्यांसाठी आखण्यात आलेली ही मोहीम आठ वर्षे चालली. मंगळयान सलग आठ वर्षे आठ दिवस अवकाशात कार्यरत होते.
पहिल्याच प्रयत्नात भारताची मंगळयान मोहिम यशस्वी
मंगळयान मोहिम 2013 साली सुरु झाली होती. 5 नोव्हेंबर 2013 रोजी श्रीहरीकोटा येथून मंगळयान अवकाशात झेपावले. 24 सप्टेंबर 2014 साली मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचले. मंगळयानाच्या यशस्वी मोहिमेसह पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला. मंगळयान मोहिमेसाठी 450 कोटी रुपये खर्च आला. आठ वर्षांच्या काळात मंगळयानाने मंगळावरील अनेक फोटो पृथ्वीपर्यंत पोहोचवले. यामुळे शास्त्रज्ञांना संशोधनात मोठा फायदा झाला.
मंगळयानाचा संपर्क तुटला
इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, मंगळयानमधील इंधन आता पूर्णपणे संपले आहे. अंतराळयानाची बॅटरीही पूर्णपणे निकामी झाली आहे. इस्त्रोचा मंगळयानाशी असलेला संपर्कही तुटला आहे.