- चित्रपट आनंद दिघेंवर होता की एकनाथ शिंदेंवर?
- एकनाथ शिंदेंनी दिघेंची ढाल पुढे करुन शिवसेना फोडली
- सगळेच आनंद दिघे नसतात, काही शिंदे असतात, ‘सामना’तून मुख्यमंत्र्यांवर निशाणा
तसेच ठाण्यात आनंद दिघे यांनीच भाजपच्या खासदाराला कसा विरोध केला होता, याची कहाणीही ‘रोखठोक’मधून सांगण्यात आली आहे. तेव्हा ठाणे हा कल्याण-डोंबिवलीसह एकच लोकसभा मतदारसंघ होता व भाजपचे राम कापसे हे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्याआधी कापसे हे कल्याण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत असत. तर या कापसे यांनी बाबरी पाडल्याचा आनंद म्हणून ठाण्याच्या सेंट्रल मैदानात भाजपची सभा लावली व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना सभेस बोलावून त्यांचा वीरोचित सत्कार करण्याचे ठरवले. ही सभा म्हणजे ठाण्यातील शिवसेनेस अप्रत्यक्ष आव्हान देण्याचा पहिला प्रयोग होता. आनंद दिघे यांना हे पटले नाही. त्यांनी सभेत मोडता घातला नाही, पण संध्याकाळी ते सभेच्या ठिकाणी दूर एका बाजूला गाडीत बसून सभा ऐकायला गेले. त्यांचे खास लोक गाडीत बसले होते.सभा सुरू होताच खासदार राम कापसे भाषणास उभे राहिले. भाषणात त्यांनी कल्याण सिंग यांचा उल्लेख देशाचे एकमेव हिंदुहृदयसम्राट असा करताच दिघे अस्वस्थ झाले. त्यांचा चेहरा लालबुंद झाला. ”अरे, कापसे हे काय बोलताहेत? हिंदुहृदयसम्राट तर फक्त आपले बाळासाहेब ठाकरे आहेत. भाजप नवे हिंदुहृदयसम्राट का निर्माण करतोय? हे शिवसेनेला आव्हान आहे. ठाण्यात तरी मी चालू देणार नाही. मी आता सांगतो, इकडची दुनिया तिकडे होईल, पण कापसे पुन्हा ठाण्याचे खासदार नसतील. ठाण्याचा खासदार फक्त शिवसेनेचाच असेल!” आनंद दिघे त्या गाडीतच जाहीर करून बसले. ही खदखद त्यांनी मनातच ठेवली, पण लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच जागा वाटपात ठाण्याचा विषय येताच दिघे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा सांगितला. ठाण्यात भाजप चालणार नाही. दिघे बाळासाहेबांना भेटले व त्यांनी आग्रह केला. ”राम कापसे व भाजप ठाण्यात चालणार नाहीत. शिवसेनाप्रेमी जनता त्यांचा पराभव करेल. ठाण्याचा खासदार शिवसेनेचाच होईल.” शिवसेनाप्रमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी दिघे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दिघे ठाम होते. अखेर त्यांच्या हट्टापुढे सगळय़ांना मागे हटावे लागले. कापसे यांना मागे ठेवून ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आला व महापौर निवडणुकीत पराभूत झालेले प्रकाश परांजपे हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभेत निवडून गेले. भाजपच्या शिवसेनाद्वेषाला आव्हान देणाऱया दिघ्यांचे हे खरे रूप होते, पण शिंदेनिर्मित चित्रपटात ते कोठेच दिसले नाही, असे ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे.