सार्वजनिक-खाजगी भागीदारीस प्रोत्साहन देणार्या सर्वाधिक प्रशंसनीय केंद्रीय संस्थेचा पुरस्कार –
मुंबई, : भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अर्थात जेएनपीए बंदरास “इकॉनॉमिक टाइम्स इन्फ्रा फोकस अवॉर्ड्स 2022” मध्ये सार्वजनिक-खाजगी गुंतवणुकीस अर्थात पीपीपीला (बंदरे) प्रोत्साहन देणारी सर्वाधिक प्रशंसनीय केंद्रीय संस्था म्हणून गौरवण्यात आले.
मागील 25 वर्षांत देशात बंदर क्षेत्रातील सार्वजनिक-खाजगी गुंतवणुकीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्टने जुलै 1997 मध्ये न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी) या खाजगी टर्मिनल सोबत ऐतिहासिक करार केला होता, ज्यामुळे एनएसआईसीटी हे देशातील प्रमुख बंदरांमध्ये पीपीपी तत्त्वावर विकसित केलेले पहिले पोर्ट टर्मिनल बनले. अशा प्रकारचा करार करणारे जेएनपीए हे देशातील पहिले बंदर ठरले, ज्यामुळे जेएनपी बंदराच्या कार्यक्षमते मध्ये आणि उत्पादकते मध्ये सुध्दा वाढ झाली. जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी) साठी जेएनपीए आणि जे एम बक्शी एण्ड लॉजिस्टिक्स लि. – सीएमए टर्मिनल्स यांच्यात 29 जुलै 2022 रोजी सवलत करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती, ज्यामुळे जेएनपीए हे भारताचे पहिले 100% लॅडलॉर्ड बंदर बनले आहे.
जेएनपीएच्या वतीने उपाध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार वितरण कार्यक्रमात कृतज्ञता व्यक्त करताना उपाध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. यांनी जेएनपीएचे सर्व कर्मचारी आणि भागधारकांचे आभार मानले. पुढे ते म्हणाले की हा पुरस्कार आमच्या प्रयत्नांना आणि आमच्या भागधारकांना व ग्राहकांसाठी आम्ही देत असलेल्या कार्यक्षम सेवेची पोचपावती आहे.
इकॉनॉमिक टाईम्स इन्फ्रास्ट्रक्चर अवॉर्ड्सचे उद्दिष्ट देशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या संस्थाना शोधून त्यांना पुरस्कृत करने आहे, ज्या अन्य संस्थासाठी प्रेरणादायी आहेत. विकासक, केंद्र आणि राज्य संस्था आणि वित्त पुरवठा करणा-या जागतिक दर्जाच्या संस्था ज्या उत्कृष्ट व्यावसायिक कौशल्य, सर्वोत्तम पद्धती, अनुकरणीय दृष्टी आणि पीपीपी प्रकल्पांच्या संकल्पना, विकास आणि अंमलबजावणीमध्ये एकूणच उत्कृष्टतेचे प्रदर्शन करून इतरांसाठी अनुकरणीय बनतात अशा संस्थांना एकत्रित करण्यावर त्यांचा भर आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यास आकार देणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नांनाही या पुरस्काराने मान्यता मिळते.
जेएनपीएला अलीकडेच “मेरीटाइम आणि लॉजिस्टिक अवॉर्ड्स 2022” मध्ये ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट मेजर पोर्ट (कंटेनर)’ पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले.
जेएनपीए विषयी :
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले.
सध्या जेएनपीए येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.