सीपीआर प्रक्रियेद्वारे जीवन कसे वाचवायचे याचे दिले पोलिसांना प्रशिक्षण
मुंबई – दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल्सने यंदाचा जागतिक हृदय दिन दिल धडकने दो या थीमसह मुंबई पोलिसांसोबत अभिनव पद्धतीने साजरा केला. हृदयविकाराच्या व्याप्तीबद्दल जागरुकता वाढवणे आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे भान हरपल्यास आणि श्वासोच्छवास थांबल्यास कार्डिओपल्मोनरी रिझ्युसिटेशन (सामान्यत: सीपीआर म्हणून ओळखले जाते) करण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देणे हा यामागचा उद्देश होता. सीपीआर ही एक आणीबाणीची प्रक्रिया आहे ज्यामध्ये पुढील मदत येईपर्यंत, रुग्णवाहिका येईपर्यंत मेंदू आणि इतर अवयवांना रक्त प्रवाहित ठेवण्याच्या प्रयत्नात तोंडावाटे श्वासोच्छवासासह छाती दाबणे यांचा समावेश होतो. रुग्णालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात 25 हून अधिक पोलिसांचा सहभाग होता. या कार्यक्रमादरम्यान झायनोव्हा शाल्बी हृदयरोग तज्ञ डॉ. मुकेश पारीख, डॉ. अमित जावा, डॉ. ऋषभ पारीख आणि आयसीयू प्रभारी डॉ. अवंती भावे यांनी लोकांना सीपीआर करण्याचे प्रशिक्षण दिले.
झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे डॉ मुकेश पारीख म्हणाले, “आम्ही हा कार्यक्रम लोकांमध्ये हृदयविकाराच्या तीव्रतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि सीपीआर करून एखाद्याचा जीव कसा वाचवू शकतो यासाठी आयोजित केला होता. हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान किंवा बुडण्यासारख्या इतर परिस्थितींमध्ये जेव्हा एखाद्याचा श्वास थांबतो तेव्हा सीपीआर करता येते. सदैव अतिदक्षतेवर असणारे पोलीस या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले याचा मला खूप आनंद आहे.”
कार्डियाक सर्जन डॉ अमित जावा म्हणाले, “आम्ही अनेक रुग्णांना अगदी लहान वयोगटातील हृदयविकाराने आलेले पाहतो. अनारोग्यकारक आहार आणि व्यायामाचा अभाव याशिवाय इतर कारणे याला बहुतांश घटनांमध्ये जबाबदार असतात. लोकांनी सीपीआर प्रक्रिया शिकणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून ते एखाद्याचे प्राण वाचवू शकतील.
झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल्सचे युनिट हेड श्री रेनी वर्गीस म्हणाले, “प्रशिक्षण जरी पोलीस कर्मचार्यांसाठी होते, तरी प्रतिक्षा दालनात उपस्थित असलेले रूग्नांचे नातेवाईक देखील या उपक्रमात उत्साहाने सामील झाले होते.” जास्तीत जास्त लोकांना सीपीआर कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यासाठी घाटकोपरच्या झाइनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम नेहमी सुरु असेल अशी माहिती वर्गीस यांनी दिली.