शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे या टेंभीनाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि महाआरतीसाठी काही वेळापूर्वीच मंदिरात पोहचल्या आहेत. यावेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी असून महिला कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली आहे. दरवर्षी या देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे आणि त्यांचे कुटुंबियही येते.
तत्पूर्वी त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. त्यांनी मंदिरात देवीची ओटीही भरली असून त्यानंतर विधीवत पूजा करून त्यांनी देवीची महाआरती केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह ईतर महिला नेत्यांची उपस्थिती होती.
वाहतूक कोंडीचा फटका
रश्मी ठाकरे या मातोश्रीवरुन ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्यानंतर त्यांना वाहतूक कोडीचा मोठा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना मंदिरात आरतीसाठी येण्यास विलंब लागला. आता यावेळी रश्मी ठाकरे यांच्यासह महिला कार्यकर्त्या, शिवसैनिकांची मोठी गर्दी मंदिरात झाली आहे.
यावेळी जय भवानी जय शिवाजी, उद्धव ठाकरे आगे बढो, रश्मी ठाकरे आगे बढो, आवाज कुणाचा अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. उद्धव ठाकरे तुम्ही संघर्ष करा आम्ही सोबत आहोत यासह आनंद दिघेंचा विजय असो अशा घोषणाही देण्यात आल्या आहेत.
राजकीय दृष्टीकोन
रश्मी ठाकरे यांच्या हस्ते टेंभीनाक्यावरील देवीची महाआरती केली जाणार आहे. तरीही शिवसेना आणि शिंदे गटात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे यांच्या ठाणे भेटीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांमध्ये सतत राज्यभरातील शिवसैनिकांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधत आहेत. त्यामुळे आज रश्मी ठाकरे या एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांशीही संवाद साधला.