मनसेप्रमुख राज ठाकरे हे स्वतः एक उत्कृष्ट व्यंग्यचित्रकार आहेत. त्यांना कलेची अत्यंत उत्कृष्ट अशी जाण आहे. त्यामुळे फोटोग्राफी वा कलेशी संबंधित गोष्टींशी ते स्वतःला नेहमीच जोडून घेत असतात. व्यस्त कामातून वेळ काढून ते नेहमी फोटो प्रदर्शनाला भेट देत असतात. जागतिक पर्यटन दिनी त्यांनी पिरामल आर्ट गॅलरातील द ग्रेट पिलग्रिमेज- पंढरपूर या नावाने भरलेल्या फोटो प्रदर्शनाला पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह भेट दिली. परवेज दमानिया आणि रतन लूथ यांनी हे अत्यंत वेगळे असे फोटो प्रदर्शन भरवले आहे. हे प्रदर्शन पाहायला पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, संगीतकार लेस्ली लुईस, निशा जमवाल, डॉ सोमा घोष, रूपाली सूरी, डॉ. मुकेश बत्रा, जिमी मिस्त्री अशा अनेक नामवंतांनीही हजेरी लावली होती. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत कला संग्राहक परवेज दमानिया आणि रतन लूथ यांनी हे अनोखे फोटो प्रदर्शन भरवले आहे. देशभरातील नामवंत छायाचित्ररांच्या नजरेतून पंढरपूरची वारी या प्रदर्शनाच्या निमित्ताने समोर आली आहे. या प्रदर्शनाला ‘द ग्रेट पिलग्रिमेज- पंढरपूर’ असे नाव देण्यात आले आहे. फोटो पाहून राज ठाकरे प्रचंड खुश झाले आणि त्यांनी परवेज दमानिया आणि रतन लूथ यांचे या प्रदर्शनासाठी अभिनंदन केले.प्रदर्शन पाहायला राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, संगीतकार लेस्ली लुईस, निशा जामवाल, डॉ सोमा घोष, रूपाली सूरी, डॉ मुकेश बत्रासहित शहरातील अनेक नामवंत आले होते. यामध्ये जिमी मिस्त्री, महका मीरपुरी, बाची करकारिया, शायना एनसी, हरिंदर सिंह, अदिति गोवित्रीकर, विक्रम बावा यांचा समावेश आहे.
८०० वर्षांच्या श्रद्धेची परंपरा असलेली पंढरपूरची वारी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. या श्रद्धेची परंपरा असलेल्या वारीत राज्यभरातील दहा लाखांहून अधिक वारकरी दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला २१ दिवसांहून अधिक काळ पायी चालत पंढरपुरच्या विठुमाऊलीच्या मंदिरात पोहोचतात. गांधी टोप्या घातलेले पुरुष, डोक्यावर तुळस असलेल्या कुंड्या घेतलेल्या, रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या स्त्रिया, दिंड्यांचे नेतृत्व करणारे शूर घोडे, भगवे झेंडे, पालख्या, वीणा, मृदंग, ढोलकी आणि चिपळ्यांचा भक्तिपूर्ण आवाज, फुगडीची उर्जा. पांडुरंगाची भेट होणार या आनंदात ऊन-पावसाची तमा न करता नाचत, गाणी म्हणत पंढरपूरला जाणाऱ्या, रस्त्याने जाताना मोसमातील बिया रस्त्यावर पेरून प्रवास करणाऱ्या साध्या-सोप्या लोकांची अशी ही पंढरपुरची वारी अनेकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
जात-पात, पंथ, श्रीमंत-गरीब असा काहीही भेद न करता सगळे भक्त केवळ विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरकडे कूच करीत असतात. अशा या वारकऱ्यांचा हा प्रवास यापूर्वी अनेक छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यात कैद केलेला आहेच. पण हा संपूर्ण प्रवास फार कमी वेळा छायाचित्रकारांनी कव्हर केलेला आहे.
परोपकारी आणि कला संग्राहक परवेझ दमानिया आणि रतन लुथ, देशभरातील नामवंत छायाचित्रकारांच्या लेन्समधून अप्रतिम छायाचित्रांच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीचा संपूर्ण प्रवास दाखवणारे ‘द ग्रेट पिलग्रिमेज, पंढरपूर’ नावाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
“वारी हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि शक्तिशाली भक्तीमय प्रवास आहे. काही वर्षांपूर्वी मी वारीचा प्रवास केला आणि मंत्रमुग्ध झालो. त्या मंत्रमुग्ध क्षणांना सोबत घेऊनच मी घरी आलो. मी सतत वारीबाबतच विचार करू लागलो होतो. मग मी याबाबत रतन लुथ यांच्याशी बोललो आणि आम्ही वारीबाबत काय करता येईल याचा विचार सुरु केला. तेव्हाच वारीच्या फोटोंचे प्रदर्शन भरवावे असे आम्हाला वाटले आणि आम्ही त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले. आमच्या सुदैवाने आम्हाला सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारांची एक टीम मिळाली आणि ही छायाचित्रे समोर आणता आली.” असे परवेझ दमानिया यांनी या प्रवासामागील माहिती देताना सांगितले.
प्रख्यात छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, नामवंत छायाचित्रकार शंतनू दास, महेश लोणकर, पुबारूण बसू, मुकुंद पारके, सौरभ भाटीकर, डॉ. सावन गांधी, प्रणव देव, राहुल गोडसे आणि धनेश्वर विद्या यांच्यासह सिम्बायोसिसचे प्रा. नितीन जोशी, दीपक भोसले आणि शिवम हरमळकर यांनी नामवंत छायाचित्रकारांची एक टीम तयार केली. या टीमने वारकऱ्यांच्या श्रद्धा, दंतकथा, इतिहास आणि परंपरा यांचे हे कालातीत क्षण कॅमेऱ्यात कैद केले. भक्तीरसाची ही झेप यशस्वी व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने या उपक्रमाला सहकार्य केले आहे.
परवेझ दमानिया आणि रतन लुथ यांनी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले ‘द ग्रेट पिलग्रिमेज – पंढरपूर’ हे प्रदर्शन २८ ते ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत पिरामल गॅलरी ऑफ फोटोग्राफी, एनसीपीए येथे सुरु आहे.