लंडन : भारत-विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची गोलंदाज दिप्ती शर्माने इंग्लंडच्या फलंदाजाला अनोख्या पद्धतीने धावबाद केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. दिप्तीने इंग्लंडची फंलदाज शार्लोट डीनला धावबाद करून भारताला विजय मिळवून दिला. मात्र दिप्तीने धावबाद करण्यासाठी वापरलेली पद्धत म्हणजे मंकडिंग असून हे खेळभावनेविरोधी कृती असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. तर काहींनी दिप्तीला थेट पाठिंबा दिला असून तिने नियमांला धरूनच शार्लोट डीनला बाद केले, अशी भूमिका काहींनी घेतली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौरने या सर्व वादावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने दिप्तीला पाठिंबा दिला आहे.
हरमनप्रित कौर काय म्हणाली?
हा खेळाचा एक भाग आहे. आम्ही वेगळे काही केले आहे, असे मला वाटत नाही. हा क्रिकेटमधील एक नियम आहे. दिप्तीने ज्या पद्धतीने इंग्लंडच्या खेळाडूला बाद केले, त्यातून तिची क्रिकेटच्या नियमांविषयीची जागरुकताच दिसते. काही लोकांसाठी हा वादाचा मुद्दा असू शकतो. मात्र मी दिप्तीला पाठिंबा देत आहे. तिने काहीही चुकीचे केलेले नाही. आम्ही सामना जिंकला असून आनंद साजरा करणार आहोत, असे हरमनप्रतित कौर म्हणाली.