मुंबई : एकिकडे विरोधक ऐक्याचे बोलत असताना काँग्रेसचा ‘एकला चलो’ चा नारा; भाजपचा अश्व सूसाट धावणार कसा नाही. अशा परिस्थितीत भाजपची साम,भेद या जोड नीतीने मुंबईसह, ठाणे, कल्याण, पुणे,औरंगाबाद, नाशकात भाजपा भगवा नक्कीच फडकणार. यात काग्रेसचा मात्र सुफडा साफ झाला नाही तर नवल! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी असतात. या निवडणुकांविषयी त्यांचे आडाखे ठरलेले असतात. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडीसोबत नव्हे तर स्वबळावर लढेल, असे ते म्हणालेत.
राज्यात मुंबई सह अन्य महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही पूर्ण केली असल्याचे पटोले यांनी सांगितले आहे.
काँग्रेसची एकला चलो ची भूमिका
नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या मंथन शिबीराच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष पटोले नाशिकला आले हाेते. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी एकला चलो ची भूमिका घेतली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे पटाेले यांनी प्रसार माध्यमांशी बाेलताना सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी लढत असेल तर त्याची काळजी माध्यमांनी करू नये. एकेकाळी शिवसेना- भाजप एकत्र लढले हाेते. ते आता वेगळे लढत आहेत. त्यांचे मत विभाजनही होत असून त्याची काळजी करा असा सल्लाही त्यांनी दिला. जाती निहाय जनगणना करावी असा ठरावही मेळाव्यात मंजूर करण्यात आला.
काय म्हणाले पटोले?
- ओबीसी, भटक्या विमुक्तंना त्रास देणाऱ्यांचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. – स्वातंत्र्याच्या लढ्यात आत्ताचे राज्यकर्ते कुठेच नव्हते ते इंग्रजांसोबत होते.
- देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा फक्त 50 घरात लाईट होती, मात्र त्यानंतर काँग्रेसने देशाला उभे केले.
- देशात भूक बळी सुरू होती तेंव्हा आईने मला रेशनच्या लाईन मध्ये भल्या पाहाटे उभे केल्याचे आठवते, मात्र त्यानंतर हरित क्रांती काँग्रेसने आणली आणि आज आपण धान्य निर्यात करतो आहे.
- आशिष शेलारचा बिर्याणी खातानाचा फोटो सद्या व्हायरल होत आहे, याकूब मेमनचा भाऊ बिर्याणी खाऊ घालत होता. – जीएसटी कायद्याने सामान्य लोकांना लुटले जात आहे. – एक माणूस आता देशात श्रीमंत व्हायला निघाला आहे. त्याने घेतलेले कर्ज माफ करायला घेतले. 57 लाेकांचे 10 लाख कोटीचे कर्ज माफ केले. – उद्या युद्ध झाले तर बँकेत ठेवलेला तुमचा पैसा विश्वगुरू घेऊन जातील. – राज्यात भाजप प्रणित सरकार आल्या नंतर ओबीसी मुला मुलींची शिष्यवृत्ती काढून घेतली. – राज्यातले उद्योग बाहेर जात आहे. मुंबई जर गुजरात मध्ये गेली तर नवल वाटायला नको.
- गुजरात पाकिस्तान आहे का हे त्यांनी ठरवावं मात्र आमचे उद्योग इतरत्र जाऊ नये अशी आमची मागणी आहे. – ओबीसी मराठा भांडणात व शिवसेनेच्या दसरा मेळावा वादात आम्हाला पडायचे नाही.